Ahmadnagar Breaking : बस स्टॅण्ड, यात्रा, सभेचे ठिकाण, धार्मिक कार्यक्रम, अशा गर्दीच्या ठिकाणी मंगळसूत्र चोरी करणारी महिलांची सराईत टोळी जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी सात महिला व दोन पुरूष आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडून २० तोळे सोन्यासह सुमारे १७ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.
येथील शहर पोलिस ठाण्यात काल शनिवारी सांयकाळी आयोजित पत्रकात परिषदेत ओला बोलत होते. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी धनश्री हंबीरराव सरनौबत (वय ४२, रा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी) श्रीरामपूर बस स्टॅण्डवर आल्यावर त्यांच्या गळ्यातील ४५ हजारांचे दिड तोळे वजनाचे सोन्याचे मिनीगंठण चोरले होते.
याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारचे विविध गुन्हे श्रीरामपूर बस स्टॅण्ड येथे घडलेले असल्याने पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ तपास पथकास सदर आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
तपास पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली. आरोपींनी या गुन्ह्यामध्ये एका महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीचा वापर झाल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. आरोपीचा व वाहनाचा शोध घेत असताना दि. ९ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गुन्ह्यात वापरलेल्या गाडीमध्ये ही टोळी श्रीरामपूरकडे येत असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली.
पोलीस पथकाने तात्काळ हरेगाव फाटा येथे नाकाबंदी केली. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस पथकाने शिताफीने पाठलाग करुन या वाहनास केसरीनंदन बॅग हाऊस दुकानासमोर पकडले.
आरोपींना त्यांची नावे विचारली असता, त्यांनी वसंत विश्वानाथ मुंजाळ (एसटी डेपो बीड, रा. हिरापूर, ता. गेवराई, जि. बीड), जुबेर रज्जाक पठाण (रा. मुन्नावर मस्जिद, तेलगाव नाका, ता. जि. बीड) असल्याचे सांगितले. त्यांच्या समवेत बिड जिल्ह्यातील सात महिला होत्या. त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या पथकाने केली. अधिक तपास उपनिरीक्षक समाधान सोळंके करीत आहेत.