Ahmednagar Braking : तुळजापूर देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह चारजण ठार झाले.
अपघातातील सर्व मृत हे पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील असून, या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात बुधवार, दि. २३ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास मोहोळ हद्दीत हॉटेल सरगमच्या समोर झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रांजणगाव मशीद (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील काही महिला पुण्याहून सोलापूरकडे येत होत्या. इको कार (क्र. एम. एच. ४६ / ए.पी. ४१२०) ही सोलापूरच्या दिशेने जात असताना समोर असणाऱ्या अज्ञात वाहनास धडक बसल्याने
त्यात इको कारमधील चालक आदमअली मुनावरअली शेख (वय ३७), हिराबाई रामदास पवार (वय ७५), कमलाबाई मारुती वेताळ ( वय ६०, रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर) हे गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाल्या,
तर द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४०, रा. रांजणगाव मशीद) यांचा सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल करत असताना मृत्यू झाला. तसेच सदर इको कारमधील बाळी बाबू पवार (वय २७), छकुली भीमा पवार (वय २७),
साई योगीराज पवार (वय ७), मंदाबाई नाथा पवार (वय ५२), सुरेखा भारत मोरे (वय ४५) आणि बायजाबाई रामदास पवार (वय ६०, सर्व रा. रांजणगाव मशीद) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
मोहोळ पोलीस ठाण्यात टोल नाक्याचे पेट्रोलिंग ऑफीसर मल्लिकार्जुन बळीराम बजुल ( वय ४०, रा. मडके वस्ती, सोलापूर) यांनी मोटार अपघाताची खबर दिली आहे. याचा तपास अपघात शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले.
त्यानंतर मृतदेह मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. तर जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयाकडे तातडीने हलवण्यात आले. या वेळी परिविक्षाधीन प्रांताधिकारी अजिंक्य गोडगे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, प्रभारी तहसीलदार भालचंद्र यादव, मोहोळचे तलाठी साळुंखे आणि तहसील कार्यालयातील अन्य कर्मचारीदेखील उपस्थित होते.