अहमदनगर ब्रेकिंग : कालवा फुटला ! आवर्तन खंडित, 4-5 दिवसांत…

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- गोदावरीचा डावा कालवा फुटल्याने त्याचे आवर्तन थांबविण्यात आले आहे. चार ते पाच दिवसांत आवर्तन पुन्हा पुर्ववत सुरु होईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सोडण्यात आले होते. उजवा कालवा 200 क्युसेकने तर डावा कालवा अवघा 100 क्युसेकने सोडण्यात आला होता. रब्बीच्या दुसर्‍या आवर्तनासाठी हे पाणी सोडण्यात आले.

गोदावरीचा डावा कालवा सोडण्यात आल्यानंतर निफाड तालुक्यातील सारोळा थडी शिवारात रविवारी सायंकाळी 5 ते 5.30 वाजता 7.6 किमी अंतरावरील कलव्हर्टचा स्लॅब कोसळला.

बांधकामाचा भराव कोसळल्याने पुढील अनर्थ ओळखून डाव्या कालव्याचे आवर्तन थांबविण्यात आले आहे. कालव्याचे पाणी काही अंशी वाया गेले आहे. जलसंपदाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपअभियंता थोरात, नागरे यांनी कालवा फुटला त्या ठिकाणाची पाहणी केली.

4- 5 दिवसात हे काम पूर्ण होऊन डाव्या कालव्याचे आवर्तन पुन्हा सुरू होईल, असे जलसंपदाचे उपविभागीय अभियंता थोरात यांनी सांगितले.

दरम्यान गोदावरी कालव्यावरील जुनी बांधकामे जिर्ण झाली आहेत. कालवे ऐन आवर्तनात फुटतात. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.

ही बांधकामे कधी पक्की होणार? गोदावरी चे दोन्ही कालवे कधी पक्के होणार? पुर्ण क्षमतेने कधी वाहणार? हे प्रश्न कायम आहेत. गंजलेले कालवे आणि जिर्ण झालेले बांधकाम यावर शेकडो हेक्टर शेतीचे भवितव्य आवलंबून आहे.