Ahmednagar Flyover Accident : अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर स्टेट बँक चौकाजवळ कांदा भरलेला ट्रक पलटी झाला.
त्याच वेळी तेथून जाणारी कार या ट्रकखाली दबली गेल्याने अपघातात ट्रकचा क्लीनर जागीच ठार झाला तर तिघांना कार मधून सुखरूप बाहेर काढले. रविवारी (दि.४) रात्री हा अपघात झाला.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. नगरच्या नेप्ती कांदा मार्केट मध्ये शनिवारी (दि. ३) कांद्याचे लिलाव होते. या लिलावात व्यापाऱ्याने खरेदी केलेला कांदा ट्रक मध्ये भरून ट्रक चालक व क्लीनर असे दोघे जण नगरहून छत्रपती संभाजी नगरकडे जाण्यासाठी मध्यरात्री निघाले.
हा ट्रक उड्डाणपुलावरून जात असताना स्टेट बँक चौकाजवळील वळणावर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून रस्ता दुभाजकाला धडकून ट्रक रस्त्यावर पलटी झाला. त्याच वेळी नगरकडून कायनेटिक चौकाकडे एक मारुती कार जात होती.
ती पलटी झालेल्या ट्रक खाली दबली गेली. नागरिकांच्या मदतीने ट्रक खाली दबलेल्या कार मधील प्रवीण किसन काटे, साक्षी प्रवीण काटे व नवनाथ उदमले (रा. काळे वाडी, हिवरेझरे, ता. नगर) या तिघांना मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत कार मधून सुखरूप बाहेर काढले.
ते जखमी असल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. ट्रक खाली दबलेला इसम शुभम रघुनाथ शिंदे (वय ३५, रा. दावलवाडी, ता. बदनापूर, जि. जालना) हा जागीच मयत झाल्याचे आढळून आले.