दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी पती रोहिदास भिकाजी पंधरकर (वय ६५, रा. पिपंळगाव पिसा, ता. श्रीगोंदे) याला श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी भादवि कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा तसेच ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आरोपी पंधरकर याला दारुचे व जुगाराचे व्यसन असल्याने तो दारु पिऊन त्याच्या पत्नीस शिवीगाळ करुन मारहाण करायचा. २९ एप्रिल २०२२ रोजी आरोपी पंधरकर दारु पिऊन घरी आला.

त्यावेळी त्याने पत्नी व मुलासोबत वाद केले. पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास लहान मुलाच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांचीमुले हॉलमध्ये आले असता आरोपी त्याच्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करत होता.
ही घटना पोलिस पाटलांना कळाल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मयताचा भाऊ नाना काळे याने बेलवंडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहिदास भिकाजी पंधरकर याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
निरिक्षक विजयकुमार बोत्रे आणि पोलिस कर्मचारी कैलास शिपनकर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. यात मयताचा मुलगा आरुन व दादासाहेब, फिर्यादी, पंच साक्षीदार, डॉ. राजुळे, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
सरकारी वकील पुषा कापसे (गायके) यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला भादवि कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा तसेच ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून आशा खामकर व सुजाता जयवंत गायकवाड यांनी सहकार्य केले.