अहमदनगर ब्रेकींग: निवृत्त सैनिकाने केला अंधाधुंद गोळीबार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- आर्मी मधून निवृत्त झालेल्या सैनिकाने त्याच्याकडील परवानाधारक बंदुकीतून अंधाधुंद गोळीबार केला. सोमवारी रात्री अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास जामखेड रोड वरील करांडे मळ्यात ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या निवृत्त सैनिकास ताब्यात घेतले. संदीप रमेश बांदल (वय ४२ रा. करांडे मळा, जामखेड रोड, भिंगार) असे निवृत्त सैनिकाचे नाव आहे.

पोलीस हवालदार जालिंदर नामदेव आव्हाड यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी निवृत्त सैनिक संदीप बांदल विरोधात भादंवि १८६, ५०४, ५०६ सह भारतीय हत्यार अधिनियम, मुंबई पोलीस अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी बांदला पोलिसांनी अटक केली असून त्याला दुपारी न्यायालयात हजर करणार आहेत. सोमवारी रात्री बांदलने भिंगार येथील सोलापूर टोल नाक्यावर हुज्जत घातली. जाणार-येणाऱ्या वाहनांना त्याने टोल न भरण्यास सांगितले. गस्ती पथकावरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या घरी सोडले.

यानंतर त्याने त्याच्याकडील परवानाधारक बंदूक लोड करून घराच्या परिसरात अंधाधुंध गोळीबार केला. गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बांदल याला ताब्यात घेतले.

यावेळी त्याने पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत मोठ मोठ्याने आरडाओरडा केला. पोलिसांनी त्याच्याकडील परवानाधारक बंदूक जप्त केली आहे.

भिंगार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक बेंडकोळी, पोलीस हवालदार आव्हाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास उपनिरीक्षक बेंडकोळी करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News