Ahmednagar Breaking : सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण आरक्षण मुद्द्यावरून ढवळून निघाले आहे. दरम्यान मराठा आरक्षण मुद्दयाप्रकरणी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
परंतु याच दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात मोठी घडामोड घडली आहे. सोशल मीडियावर मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात महिला सरपंचाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. ही घटना शेंडी येथे परवा (शनिवारी) घडली.

यानंतर गावातील लोकांनी एकत्र येत निषेध व्यक्त करत गावातून फेरीही काढली. दरम्यान महिला सरपंच कुटुंबासह पसार झाली आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावात सभा घेऊन जोपर्यंत सरपंच लेखी स्वरूपात माफी मागत नाहीत,
तोपर्यंत त्यांना गावात पाय ठेवू देणार नाही, असा पवित्राच आता घेतला आहे. या सरपंचाविरोधात दाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम ५०५ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर तालुक्यातील शेंडी येथे प्रयागा लोंढे या महिला सरपंच आहेत. या गावातील लोकांनी शेंडी वार्ता हा ग्रुप बनवलेला आहे. या ग्रुपवर त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने संतप्त ग्रामस्थांनी दत्त मंदिर परिसरात एकत्र येत निषेध सभा घेतली.
गावातून रॅली काढून सरपंचांविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला काळे फासले. नागापूर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी गावात येत शांततेचे आवाहन नागरिकांना केले.
गावकऱ्यांनी यावेळी सरपंच लेखी माफी मागत नाही तोपर्यंत गावात पाऊल ठेऊ देणार नाही असा पवित्रच यावेळी घेतला. यावेळी माजी सरपंच सीताराम दाणी, कापूरवाडीचे सरपंच सचिन दुसुंगे, वारूळवाडीचे सरपंच सागर कर्डिले, पोखर्डीचे सरपंच अंतू वारुळे,
माजी सरपंच रामेश्वर निमसे, अजय महाराज बारस्कर आदींसह गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणी नागापूर एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत असून सर्वानाच शांततेचे आवाहन करत आहेत.