अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या सभेत शिवाजी कर्डिले यांनी घेतला महत्वाचा निर्णय ! सभासदांना मिळणार…

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक विकास सेवा सोसायटीच्या थकबाकीदार शेतकरी सभासदांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला आहे,

अशी माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. शासनाकडून सन २०१६ पासून वेळोवळी कर्जमाफी देण्यात आली. मात्र कर्जमाफीच्या योजनेत काही कर्ज प्रकारांचा समावेश नव्हता. यामध्ये जुन्या पाइपलाइन कर्ज, मध्यम मुदत ट्रॅक्टर कर्जाचा समावेश नव्हता.

त्यामुळे अशाप्रकारचे कर्ज घेतलेले शेतकरी थकबाकीदार झाले. परिणामी असे सभासद शासनाच्या इतर सवलतीच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. हे शेतकरी सभासद बँकेकडे थकबाकी भरून नियमित कर्जदार होण्यास तयार आहेत.

परंतु, हे शेतकरी सभासद थकबाकीच्या व्याजात काही सवलत द्यावी, अशी मागणी करत आहेत. त्यावर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात सविस्तर चर्चा होऊन जिल्ह्यातील प्राथमिक विकास सेवा सोसायटीच्या थकबाकीदार शेतकरी सभासदांना दिलासा देण्यासाठी एक रकमी परतफेड योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला, असे बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांनी सांगितले.

जे शेतकरी सभासद दिनांक १.७.२०१६ पूर्वीचे थकबाकीदार आहेत, अशा सभासदांना साधारणतः व्याजदरामध्ये जवळपास दर साल दर शेकडा ४ टक्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. यानुसार साधारण मागील ७ वर्षे ते १० वर्षापर्यंत थकबाकीदार सभासदांना व्याज रकमेत २४ ते ३० टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते.

तसेच १० वर्षांपेक्षा जास्त थकबाकीदार शेतकऱ्यांना एकूण व्याज रकमेत साधारण ५० ते ७५ टक्क्यापर्यंत सवलत मिळू शकते. योजना कालावधी सहकार खाते व नाबार्डची मंजुरी मिळाल्यानंतर १ वर्षे असेल. या योजनेचा अधिकाधिक शेतकरी सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी कर्डिले व माधवराव कानवडे यांनी केले आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe