Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामुळे आत्तापासूनच राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लगेचच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आखाडे आता निवडणुकांच्या स्वागतासाठी तयार होत आहेत.
सर्वत्र आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अहमदनगर मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर महायुतीच्याच एका नेत्याने मोठा हल्ला चढवला आहे.

खरे तर, डॉक्टर सुजय विखे पाटील हे नगर दक्षिणमधून खासदार आहेत. विशेष म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा यांच्या महायुतीकडून आगामी लोकसभेत देखील डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच नगर दक्षिण मधून उमेदवारी मिळणार असे चित्र तयार होत आहे.
विखे पिता पुत्र दिल्ली दरबारी असणाऱ्या आपल्या वजनाचा वापर करून यावेळी सुद्धा नगर दक्षिण मधून डॉक्टर सुजय विखे यांच्यासाठी उमेदवारी घेऊनच येणार अशा चर्चा पाहायला मिळत आहेत.
मात्र आगामी निवडणूक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्यासाठी मोठी आव्हानात्मक ठरणार आहे. एकीकडे विखे पिता-पुत्र यांच्यावर स्व-पक्षातूनच चॅलेंज केले जात आहे.
विधान परिषदेचे भाजपा आमदार राम शिंदे यांनी विखे यांच्या विरोधात मोर्चा खोलला आहे. दुसरीकडे आता महायुतीच्या घटक पक्षातील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार निलेश लंके यांनी देखील विखे यांचा समाचार घेतला आहे.
यामुळे महायुतीमध्ये सर्व आलबेल नाहीये हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. आमदार निलेश लंके आणि विखे पाटील यांच्यामधला राजकीय संघर्ष हा संपूर्ण जिल्ह्याला ठाऊकच आहे. वास्तविक, सध्या स्थितीला नगर दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात साखर आणि डाळ वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
साखर वाटपाच्या माध्यमातून मत पेरणी करण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान विखे यांच्या साखर पेरणीतून होणाऱ्या मत पेरणीवर विखे पिता-पुत्र यांना लंके यांनी टार्गेट केले आहे.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी, “मी डाळ शेंगदाणे वाटणाऱ्यातला नाही. मी काम करणारा आहे. पाच वर्षांनी फिरकणारा मी माणूस नाही. नाहीतर काही लोक तुम्ही पाहिले असतील थेट पाच वर्षांनीच डाळ-गुळ घेऊन तुमच्या गावात आले असतील. लोक मेले आहेत की जिवंत आहेत, हे बघायला पुन्हा पाच वर्ष त्यांना वेळ नाही.
पण इथे काहीही अडचण आली तरी मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे,” असे म्हणत विखे पाटील यांच्यावर घनाघाती हल्ला चढवला आहे. पूढे आमदार लंकें यांनी पारनेरमध्ये प्रतिस्पर्ध्यांची जिरवली आता दुसऱ्यांची जिरवायची आहे, असे देखील म्हटले आहे. यावरून आपण जरी महायुतीत असलो तरी देखील येणाऱ्या काळातील आपले राजकीय विरोधक विखेच असतील, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
निलेश लंके यांनी आज पारनेर तालुक्यातील गारखिंडी आणि कळस या गावाचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचा शुभारंभ केला आणि उपस्थित ग्रामस्थांना त्यांनी संबोधित केले. या संबोधन पर भाषणातच त्यांनी विखे यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे.
निलेश लंके यांनी “दाळ-गुळ वाटणाऱ्यांवर जास्त विश्वास ठेवू नका. मोठ्या लोकांच्या जास्त नादाला लागू नका. मी तुमच्या हक्काचा माणूस आहे. चुकलो तरी माझा कान धरून मी चुकलोय, असे तुम्हाला सांगता येईल.
फक्त स्टेजवर भाषणे करणाऱ्या कर्तव्यशून्य लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका,” अशी टीका सुद्धा विखे यांच्यावर केली आहे. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांना त्यांनी माझ्याकडे आणखी सहा महिन्याचा कार्यकाळ शिल्लक असून यामध्ये मी तुम्ही सांगितलेली सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असे देखील आश्वासन दिले आहे.
एकंदरीत इंडिया आघाडीकडून अहमदनगरमध्ये विखे यांना जेवढा विरोध सहन करावा लागत नाहीये तेवढा विरोध त्यांच्या स्वतःच्या पक्षातून आणि महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांकडून सहन करावा लागत आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत डॉक्टर सुजय विखे यांना नगर दक्षिणमधून उमेदवारी मिळणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.