Ahmednagar Breaking : अहमदनगर हादरले ! अल्पवयीन मुलीच्या प्रेमात दुसऱ्या अल्पवयीन मुलीचा अडसर, तिचे अपहरण करून प्रियकराच्या मदतीने केला निर्घृण खून

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात अनेक धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. या गुन्हेगारी विश्वात अल्पवयीन मुले, मुली सुद्धा आता येताना दिसतात. आता अहमदनगर जिल्ह्यातून एक हादरवणारी बातमी आली आहे.

अल्पवयीन मुलीला पळवून नेत अतिप्रसंग करून तिला मारहाण केली गेली. त्यानंतर तिला विहिरीत ढकलून देत खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी (दि. १३) देहरे (ता. नगर) येथून या मुलीचे अपहरण करण्यात आले होते.

साक्षी असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. साक्षी यांच्या मामाने दिलेल्या फिर्यादीवरून एका अल्पवयीन मुलीसह दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्ह्यातील दुसरा संशयित आरोपी गोट्या उर्फ ऋत्वीक संजय जाधव (रा. देहरे) यालाही ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी : साक्षी पिटेकर हिला शनिवारी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद तिची आई सुवर्णा पिटेकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान साक्षीचा मृतदेह काल (मंगळवार) दुपारी देहरे येथील एका विहीरीत सापडला.

याबाबतची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती साक्षीच्या नातेवाईकांना देण्यात आली. पोलिसांनी तपासाची सूत्र हलवताच अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आरोपी गोट्या उर्फ ऋत्वीक संजय जाधव याचे अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तसेच गोट्या साक्षी सोबत देखील बोलत होता.

ही बाब अल्पवयीन मुलीला खटकली. यातूनच त्या अल्पवयीन मुलीने साक्षीला मारहाण केली व तिला देहरे शिवारातील जाधव वस्तीकडे घेऊन गेली. तेथे गेल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीने गोट्या उर्फ ऋत्वीक जाधव याच्या मदतीने साक्षीला हत्याराने डोक्यात मारहाण करून विहिरीत ढकलून दिले. गोट्याने साक्षीसोबत अतिप्रसंग केला असल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी खून, अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील असून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत बाल सुधारगृहात पाठवले. गोट्या उर्फ ऋत्वीक संजय जाधव याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe