Ajit Pawar Death : राज्यात 3 दिवस शाळा बंद असतील का ? शाळा बंद की सुरू ? पालकांमध्ये गोंधळ

Published on -

महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी घटना आज समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे राज्यभरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र भावना उमटत आहेत. सकाळपासूनच प्रशासन, राजकीय वर्तुळ आणि सामान्य जनतेत अस्वस्थता दिसून येत आहे.

अपघाताची प्राथमिक माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, आज २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजता बारामती परिसरात हा अपघात झाला. अजित पवार हे VTSSK-LJ45 या खासगी विमानातून प्रवास करत होते. संबंधित विमान ‘प्लॅटिनम एअर’ या चार्टर्ड कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीकडे जात असताना ही घटना घडल्याचे नमूद केले जात आहे.

बारामतीसह राज्यभर शोकमय वातावरण

बारामतीच्या मातीतच हा दुर्दैवी अपघात झाल्याने परिसरात तीव्र शोकभावना आहे. शहरातील अनेक भागांत नागरिक एकत्र येऊन दुःख व्यक्त करत आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व स्तरांतून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. सामाजिक माध्यमांवरही शोकसंदेशांचा अक्षरशः पूर आला आहे.

मुख्यमंत्र्यांची घोषणा: शासकीय सुट्टी आणि दुखवटा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देत राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर केली. यासोबतच तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आज, २८ जानेवारी रोजी राज्य सरकारची सर्व कार्यालये बंद राहणार आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे नियोजित सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

शाळा-कॉलेजांबाबत संभ्रम

शासकीय सुट्टीच्या घोषणेमुळे शाळा आणि पालकांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे. स्पष्ट करण्यात आलेल्या माहितीनुसार, २९ आणि ३० जानेवारी रोजी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये नियमितपणे सुरू राहणार आहेत. केवळ आजच्या दिवशी सुट्टी लागू असून उर्वरित दोन दिवस राजकीय दुखवटा पाळला जाणार आहे.

नेतृत्वाची तत्काळ हालचाल

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ते बारामतीकडे रवाना झालर आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

महाराष्ट्रासाठी मोठी हानी

अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेले, प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी नेता गमावल्याचे मत विविध क्षेत्रांतून व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe