Arun Kaka Jagtap passes away : अहिल्यानगर शहराचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप (वय ६७) यांचे आज, २ मे रोजी पहाटे पुण्यात निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते.
त्यांच्या निधनाने केवळ नगर जिल्हाच नव्हे, तर राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘काका’ या नावाने परिचित असलेले अरुणकाका हे एक संयमी, समर्पित आणि जनतेशी नाळ जुळवून ठेवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले – आमदार संग्राम व माजी जि.प. सदस्य सचिन, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

ते आजारी असल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. अनेक नेते, मंत्री आणि कार्यकर्त्यांनीही त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली होती. ही गर्दी नियंत्रणात राहावी म्हणून पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षांनी विशेष आवाहन केले होते.
अंत्यदर्शन व अंत्यसंस्कार कार्यक्रम:
अरुणकाका जगताप यांचे पार्थिव आज दुपारी २ वाजता त्यांच्या राहत्या घरी सारसनगर, भवानीनगर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर अंत्ययात्रा महात्मा फुले चौक, मार्केट यार्ड, जिल्हा सहकारी बँक, स्वस्तिक चौक, टिळक रोड, आयुर्वेद चौक, बाबावाडी, नालेगाव मार्गे अमरधाम स्मशानभूमीकडे निघेल. दुपारी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
अरुणकाका जगताप यांना काय झालं होत ?
गेल्या महिन्याभरापासून माजी आमदार अरुणकाका जगताप यांची प्रकृती चिंताजनक होती. मेंदूत झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांना ५ एप्रिल रोजी तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अतिदक्षता विभागात त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. जवळपास एक महिना त्यांनी मृत्यूशी झुंज दिली, मात्र अखेर त्यांच्या प्रकृतीने साथ न दिल्याने २ मे रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या लढ्याने त्यांच्या जिद्दी आणि मानसिक ताकदीची जाणीव करून दिली, परंतु नियतीपुढे सर्व हतबल ठरले.