भारत-पाक तणाव वाढताच राज्य सरकार अलर्ट मोडवर! अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द तर राज्यात युद्धसज्जतेची मोठी तयारी सुरू

भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सज्जता वाढवण्यात येत असून, प्रत्येक जिल्ह्यात वॉररूम स्थापन केली जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून सायबर सुरक्षेपासून मॉकड्रिलपर्यंत विविध उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

Published on -

भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता गडद होत असताना राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आरोग्य, आपत्ती व्यवस्थापनासह सर्व महत्त्वाच्या विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्यातील सुरक्षा आणि सज्जतेचा सखोल आढावा घेण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉर रूम’ स्थापन करण्याचे आणि मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारण्याच्या सूचना

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूण परिस्थितीचा अहवाल मागवला. त्यांनी मॉक ड्रिल, ब्लॅकआऊट यासारख्या उपाययोजनांबाबत सविस्तर सूचना दिल्या. प्रत्येक जिल्ह्यात मॉक ड्रिल घ्यावीत आणि जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’चे सखोल अध्ययन करून त्याची माहिती सर्व संबंधितांना द्यावी, असेही त्यांनी सांगितले. मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महापालिकांना ‘ब्लॅकआऊट’बाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांचाही सहभाग घ्यावा, असे फडणवीस यांनी सुचवले.

सायबर ऑडिट करण्याचे आदेश

राज्य सरकारच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर सायबर हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन सायबर विभागाने तातडीने सायबर ऑडिट करावे, असे आदेश फडणवीस यांनी दिले. तसेच, सरकार आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याच्या तिन्ही दलांच्या आणि कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत बोलावण्याचे निर्देश त्यांनी दिले. पोलिसांनी नेहमीपेक्षा अधिक सतर्क राहावे, असे सांगत त्यांनी देशद्रोही कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन आणि गस्त वाढवण्याचे आदेश दिले.

अफवा पसरवणाऱ्यावर तात्काळ कारवाईचे निर्देश

सामाजिक माध्यमांवर पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या हॅण्डल्सवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलिसांच्या सायबर सेलला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. शत्रूला मदत करणारी किंवा खोटी माहिती पसरवणारी कोणतीही व्यक्ती आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, असे फडणवीस यांनी बजावले. सागरी सुरक्षेसाठी फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्यावीत आणि नागरिकांना खरी आणि अद्ययावत माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था उभारावी, असेही त्यांनी सांगितले.

सैन्याचे चित्रीकरण प्रसारित होणार नाही खबरदारी घेण्याचे आवाहन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सैन्य आणि तटरक्षक दलाच्या तयारीचे चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले. ब्लॅकआऊटच्या वेळी रुग्णालयांशी समन्वय ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी, असेही त्यांनी सुचवले. याशिवाय, पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवावी आणि बाहेरून प्रकाश दिसणार नाही यासाठी गडद रंगाचे पडदे किंवा काचा वापराव्यात, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून तातडीच्या गरजेसाठी साहित्य खरेदी करता येईल. कोणताही महत्त्वाचा प्रस्ताव आल्यास तो एका तासात मंजूर करावा, असेही फडणवीस यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News