अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- नगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौरी प्रशांत गडाख आत्महत्या प्रकरणी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख व त्यांच्या पत्नी सुनिता शंकरराव गडाख यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली आहे.(Ahmednagar Breaking)
गुन्हा दाखल होण्यासाठी ऋषिकेश वसंत शेटे यांनी ही खासगी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना अहवाल मागितला असून प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, यामुळे मंत्री गडाख अडचणीत येण्याची शक्यता आहे.
या फिर्यादीवर 23 डिसेंबर 2021 रोजी न्यायालयाने तपासी अधिकारी तोफखाना पोलीस ठाणे यांचा अहवाल मागितला होता. प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. खाजगी फिर्यादीत ऋषिकेश शेटे यांनी म्हटले आहे की, स्वर्गीय गौरी प्रशांत गडाख यांचा मृत्यू 7 नोव्हेंबर 2020 रोजी झाला, अशा बातम्या माध्यमांतून आल्या.
त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे. गौरी गडाख या घरातील सर्व गोष्टी बाहेर सांगत होत्या. त्याप्रमाणे त्यांनी बाहेर असे सांगितले की, त्यांचे पती प्रशांत गडाख यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आपले बंधू म्हणजे शंकरराव गडाख यांना 50 कोटी रुपये उसने दिले होते.
शंकरराव गडाख हे प्रशांत गडाख व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास देत होते. मुळा एज्युकेशन सोसायटी व संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर कर असा आग्रह त्यांनी धरला होता. त्यांचे सगळे व्यवसाय वेगवेगळे होते. परंतु मुळा एज्युकेशन संस्थेत जास्त पैसा मिळत होता म्हणून शंकरराव गडाख यांना तेथे हिस्सा पाहिजे होता.
गौरी व प्रशांत गडाख यांचा संसार गोडीगुलाबीने सुरू होता. प्रशांत गडाख यांनी उसने दिलेले 50 कोटी रुपये शंकरराव यांना मागायला सुरुवात केली. मात्र शंकरराव गडाख यांनी हे पैसे देण्यास नकार दिला. प्रशांत गडाख यांच्याकडे संपत्ती राहू नये अशी भावना शंकराव गडाख यांची होती.
यादरम्यान प्रशांत गडाख दारू प्यायला लागले. याचा फायदा घेऊन सुनीता गडाख या त्यांच्या दारूत विषारी घटक कालवायला लागल्या. त्यामुळे प्रशांत गडाख यांची तब्येत बिघडत गेली व ते शारिरीक अनफिट झाले. त्यामुळे गौरी गडाख अस्वस्थ होत्या.
गौरी गडाख यांना शंकरराव गडाख व सुनिता गडाख यांनी मारले. या सर्व गोष्टीमुळे प्रशांत व गौरी गडाख यांचा संसार उद्ध्वस्त झाला. गौरी गडाख या माझ्या मानलेल्या बहिण होत्या. म्हणून त्या मला सर्व गोष्टी सांगत होत्या, असे शेटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
शंकरराव व सुनिता गडाख यांच्यावर भादंवि 302, 120 ब , 201 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, असा फिर्याद अर्ज शेटे यांनी न्यायालयात दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम