माऊली गव्हाणे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट ! मुख्य आरोपीने दिली धक्कादायक कबुली

Published on -

Mauli Gavane Murder Case : अहिल्यानगर जिल्ह्यातील दाणेवाडीत एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. माऊली गव्हाणे यांचा अमानुषपणे खून करण्यात आला असून, या घटनेनंतर गाव पोलीस छावणीसारखे दिसू लागले आहे. या घटनेचा तपास सुरू असताना, अखेर दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.

पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरील दाणेवाडी येथे झालेल्या या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली होती. तर दुसरा आरोपी, जो अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे, त्यालाही सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. या दोघांनी खुनाची कबुली दिली असून, त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

मुख्य आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे आणि त्याचा अल्पवयीन साथीदार हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून समलैंगिक संबंधात होते. माऊली गव्हाणे यांना याबाबत माहिती मिळाली होती आणि त्यांनी ही गोष्ट इतर कुणाला सांगू नये, यासाठी आरोपींनी त्यांचा खून करण्याचा कट रचला.

गुरुवारी, ६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास आरोपींनी माऊली यांच्याशी चर्चा करण्याच्या बहाण्याने संवाद साधला आणि रात्री भेटायचे ठरले. रात्री ११.३० वाजता त्यांनी टॉर्चच्या उजेडाचा संकेत देऊन माऊलीला एका ठिकाणी बोलावून घेतले. यानंतर, दोघांनी निर्घृणपणे गळा आवळून ठार मारले.

खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने हात, पाय, धड आणि डोके वेगवेगळे केले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. शीर, एक पाय आणि दोन हात घोड नदीच्या काठावर असलेल्या विहिरींमध्ये टाकण्यात आले, तर धड इतरत्र विलीन करण्यात आले.

या घटनेने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. गुन्हेगारांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा गुन्हा केला होता. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सतर्कतेमुळे काही दिवसांतच आरोपींना अटक करण्यात यश आले. गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी तपासाला गती दिली आणि या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला.

या अमानुष हत्येने गव्हाणे कुटुंबीय आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी नातेवाईकांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. गुन्ह्यातील कलमे कठोर असावीत आणि आरोपपत्र इतके प्रभावी असावे की आरोपींच्या वकिलांना त्यांच्याविरुद्ध बचाव करण्याची संधीही मिळू नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

याशिवाय, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि सरकारी वकिल म्हणून प्रसिद्ध अभियोक्ता अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी ग्रामस्थांची भावना आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News