रक्तरंजित कट! ९ आरोपींनी मिळून केली थरारक हत्या,केस कापायला गेलेला तरुण घरी परतलाच नाही…

Published on -

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका 19 वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याचा अमानुषपणे खून करण्यात आला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह केकताई येथील डोंगराळ भागात जाळून विल्हेवाट लावण्यात आली. वैभव शिवाजी नायकोडी असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणात तोफखाना पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 9 आरोपींना अटक केली आहे.

वादातून भयंकर कट रचला

ही घटना एमआयडीसी परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून घडली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी, सुमित बाळासाहेब थोरात, महेश मारोतीराव पाटील, नितीन उर्फ निशिकांत अशोक नन्नवरे, विशाल दीपक कापरे, विकास अशोक गव्हाणे, करण सुंदर शिंदे, रोहित बापुसाहेब गोसावी आणि स्वप्नील रमाकांत पाटील यांचा समावेश आहे. सध्या चौघांना अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर उर्वरित पाच आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यात चौघांना अटक केल्यानंतर आरोपींनी वैभव आमच्या ताब्यातून पळून गेला अशी खोटी माहिती पोलिसांना दिली. मात्र, तपासादरम्यान पाच आरोपींनी खुनाची कबुली दिली.

केकताई भागात मृतदेहाचे अवशेष मिळाले

तपासादरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तेथून जळलेले हाडांचे अवशेष हस्तगत केले. हे अवशेष वैभवच्या मृतदेहाचे आहेत का, हे निश्चित करण्यासाठी फॉरेन्सिक व डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. याशिवाय, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन स्विफ्ट कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

तपोवन रस्त्यावरून अपहरण, अमानुष मारहाण

22 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 च्या सुमारास तपोवन रस्त्यावरून कारने अपहरण करण्यात आले. त्यानंतर एका शाळेजवळ आणि एमआयडीसीतील अपार्टमेंटमध्ये त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी केकताई येथील डोंगराळ भागात मृतदेह जाळण्यात आला.

सलूनमध्ये गेला, घरी परतलाच नाही

वैभव 22 फेब्रुवारी रोजी रात्री सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेला होता, परंतु तो घरी परतलाच नाही. त्याच्या आईने 27 फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रारंभी चौघांना अटक करण्यात आली, मात्र स्थानिक गुन्हे शाखेने उर्वरित पाच आरोपींना पकडल्यानंतर हा संपूर्ण कट उघडकीस आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe