Ahmadnagar Breaking : भाऊबीजेसाठी बहिणीच्या घरी येणाऱ्या भावावर काळाने घाला घातला. कांचनवाडी जवळ दुचाकीला एका अज्ञात वाहनाने चिरडल्याने या दुर्दैवी अपघातात दोघेही जागीच ठार झाले.
हा अपघात गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडला. सुरेश परदेशी (वय ७५) व केशव विठ्ठल भिसे (२३ रा. बालमटाकळी ता. शेवगाव जि. अहमदनगर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दोघे शेवगाव-पैठण मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. भाऊबीजेच्या सणासाठी शहरात येत असताना कांचनवाडीतील बॅच मार्कसमोर त्यांचा अपघात झाला.
समोर जाणाऱ्या मोठ्या वाहनाला ओव्हरटेक करताना अचानक समोरून दुसरी दुचाकी आली. अचानक आलेल्या या दुचाकीने त्यांची मोटारसायकल स्लिप झाली अन दोघेही पाठीमागून येणाऱ्या वाहनाखाली आले. चाकाखाली आल्याने सुरेश परदेशी यांचा जागीच मृत्यू झाला.
तर गंभीर जखमी केशव भिसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करीत मयत आणि जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सीसीटिव्ही तपासणार
पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले की, रात्री अपघात झाल्याने अजून तपास सुरू आहे. प्राथमिक माहिती मिळाली असून त्याआधारे पुढील कारवाई केली जात आहे.
अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेतला जात असून परिसरातील सीसिटिव्ही फुटेज तपासण्यात येतील. मयतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली असून प्रेत त्यांच्या ताब्यात देण्याची कारवाई करण्यात आली.
अन बहिणीची भेट झालीच नाही
केशव भिसे व सुरेश परदेशी हे दोघेही बालम टाकळीचे, सुरेश यांना नातेवाईकांकडे छत्रपती संभाजीनगरला जायचे होते. तर केशव भाऊबीजेसाठी बहिणीला घ्यायला जाणार होता. तु चाललाच आहेस तर मलाही सोबत येऊ दे असे सुरेश यांनी केशवला म्हटले,
त्यानुसार गुरुवारी दुपारीच दोघेही दुचाकीने बालमटाकळीहून निघाले. केशव याने बहिणीला मी तुला घ्यायला येतो असे सांगितले होते. मात्र नियतीने बहिण भावाची भेट होऊच दिली नाही.