Ahmednagar Breaking : मंदिरासमोर डोक्यात दगड घालून वृध्दाची निर्घृण हत्या

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक निर्घृण खुनाचे वृत्त आले आहे. ६५ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील चिंचेवाडी शिवारात मलीबाबा मंदिरासमोर ही घटना घडली.

देवराम मुक्ता खेमनर (वय ६५ रा. चिंचेवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा खून करण्यात आला. घटनेची माहिती समजताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

अधिक माहिती अशी : मलीबाबा मंदिर हे साकूर-संगमनेर महामार्गालगत चिंचेवाडी शिवारात असून या मंदिराच्या समोर छोटेसे शेड आहे. याच शेडमध्ये देवराम खेमनर यांचा मृतदेह सापडला. गुरुवारी सकाळी येथील नागरिकांच्या ही घटना लक्षात आली. त्यांना देवराम यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. घटनेची माहिती समजताच पसरताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, मृतदेहाजवळच दगड, चप्पल, आधारकार्डासह इतर कागदपत्रे आढळून आली. यावेळी बाजूलाच रक्ताने माखलेला दगड पडलेला होता. यावेळी श्वान पथकासह ठसे तज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. देवराम खेमनर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. परंतु देवराम खेमनर यांचा खून कुणी केला असावा याबाबत अद्याप उलगडा झाला नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत.

श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके, गणेश लोंढे, नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली होती.

अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अशा गुन्हेगारी घटना सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे परिसरातील लोकांत भीतीचे वातावरण दिसते. पोलिसांनी अशा प्रवृत्तीचा बिमोड करावा अशी मागणी नागरिकांमधून सातत्याने होत असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe