Ahmadnagar Breaking : शहरातील एका मंदिर परिसरात काही युवक हिरवे झेंडे लावत असून मोठी दंगल होऊ शकते असा एक फोन 112 या नंबरवर पोलिसांना आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. ही घटना 1 ऑक्टोबरच्या पहाटे दोन च्या दरम्यान घडली.
अहमदनगर शहरातील रामवाडी चौक मांगेबाबा मंदिर परिसरात काही युवक हिरवे झेंडे लावत आहेत. या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडून दंगल होऊ शकते असा एक कॉल पोलिसांच्या 112 नंबर वर आला. ताबडतोब हा संदेश तोफखाना पोलिसांना देण्यात आला.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली. परंतु याठिकाणी शांतता होती. कोणताही गडबड गोंधळ नव्हता. तरीही खात्री करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांशी संपर्क साधला.
परंतु असा कोणताही अनुचित प्रकार मागील अनेक दिवसांपासून घडलंच नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ही केवळ अफवाच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ही माहिती देणाऱ्यास कॉल लावण्याचा प्रयत्न केला परंतु कॉल उचललाच गेला नाही.
अखेर पोलिसांनी या घटनेची स्टेशन डायरीत नोंद करत खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस कॉन्स्टेबल गोरख मच्छिंद्र धाकतोडे यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात भादवि कलम 182 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.