अमेरिकेत जन्मतः नागरिकत्व मिळणे होणार बंद ! संसदेत विधेयक सादर, लवकरच मंजूर होण्याची शक्यता

Sushant Kulkarni
Published:

३१ जानेवारी २०२५ वॉशिंग्टन : अमेरिकेत वास्तव्यास असलेले अवैध शरणार्थी व तात्पुरते व्हिसाधारक बिगर शरणाथ्यांच्या बालकांना जन्मतः नागरिकत्व देण्यावर बंदी घालणारे विधेयक संसदेचे वरिष्ठ सभागृह सीनेटमध्ये गुरुवारी सत्तारूढ रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांच्या एका समूहाने सादर केले. देशाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सत्ताकाळात जन्मजात नागरिकत्व देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्या दिशेने प्रत्यक्षात पाऊल टाकत संसदेत लवकरच कायदा करण्यात येणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे खासदार लिंडसे ग्राहम, टेड क्रूज आणि केटी ब्रिट यांनी सीनेटमध्ये ‘जन्मजात नागरिकत्व अधिनियम-२०२५’ हे विधेयक मांडले आहे. जन्मतः नागरिकत्व मिळत असल्यामुळे अवैध शरणार्थ्यांचे लोंढे अमेरिकेत येत असून त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.जन्मजात नागरिकत्व देण्यावर बंदी नसलेल्या जगातील ३३ देशांमध्ये अमेरिकेचा समावेश होतो. परंतु, आता अशा प्रकारे नागरिकत्व देणे बंद करण्यात येणार आहे, अशी ठळक तरतूद या विधेयकात आहे.

याविषयी माहिती देताना खासदार लिंडसे ग्राहम म्हणतात की, अमेरिकेत जन्मतः नागरिकत्व मिळण्याचे धोरण बदलण्यास खूप उशीर झाला आहे.येथील भूमीवर जन्म घेतल्यानं सहजगत्या अमेरिकेचे नागरिकत्व मिळू लागल्याने या धोरणाचा अनेक लोक गैरफायदा घेत आहेत.म्हणून जन्मजात नागरिकत्व देणे बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या अध्यादेशाचे मी कौतुक करतो.

आता अमेरिकासुद्धा इतर देशांसोबत मिळून जन्मजात नागरिकत्व मिळण्यावर बंदी घालत असून हे एक स्तुत्य पाऊल आहे,असे त्यांनी नमूद केले.उल्लेखनीय बाब अशी की, डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाची सत्तासूत्रे हाती घेतल्याच्या पहिल्याच दिवशी जन्मजात नागिरकत्व बंदीसंबंधित अध्यादेशावर स्वाक्षरी केली होती.आता त्या दिशेने प्रत्यक्षात पाऊल टाकत एक नवे विधेयक सीनेट सभागृहात मांडण्यात आले आहे.

येत्या काळ काळात ते बहुमताने पारित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदेशी दाम्पत्याने अमेरिकेत जन्मास घातलेल्या बालकाला येथील नागरिकत्व मिळणार नाही.दरम्यान,अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अवैध शरणार्थ्यांकडून सुमारे २ लाख २५ हजार ते २ लाख ५० हजार मुले जन्माला येणार आहेत.अमेरिकेत जन्म घेणाऱ्यांपैकी त्यांची संख्या ही सुमारे ७ टक्के असणार आहे, असा अंदाज आव्रजन अध्ययन केंद्राने वर्तवला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe