अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- नागरिकांकडूल कोविड नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा परिणाम जिल्ह्यातील कोविडचा प्रादुर्भाव वाढण्यात झाला असून प्रशासनाला पुन्हा पूर्ण ताकदीने सक्रीय होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यापुढे ज्या दुकानात अथवा मंगल कार्यालयात मास्कशिवाय लोकांची उपस्थिती आढळल्यास ती ठिकाणं महिनाभर सिल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेर येथे दिली.
फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. त्यातही जिल्ह्यातील अहमदनगर, राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर व राहाता तालुक्यात झपाट्याने रुग्णवाढ होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेरला भेट देत पालिकेच्या अधिकार्यांसमवेत कोविड स्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी पोलिसांना सक्तिने कारवाई करण्याचे आदेश देतांना कोणतीही हाईगाई न करता मास्क शिवाय फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच अनेक दुकानांमध्ये कोविडच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आल्याने मास्कशिवाय दुकानदार अथवा ग्राहक आढळल्यास तसेच मंगल कार्यालयांमध्येही मास्कशिवाय कोणी दिसल्यास अशी ठिकाणी महिनाभर सिल करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
प्रतिबंधित क्षेत्राची अंमलबजावणी सक्तिने करण्यासोबतच रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तिचा शोध घेण्याची प्रक्रीया सुरु करुन कोविड बाधितांना शोधून विलग करणे आवश्यक असल्याने त्या संबंधितांच्या मार्गदर्शक सूचनांचे कठोरतेने पालन करण्याचे आदेशही जिल्हाधिकार्यांनी सर्व अधिकार्यांना दिले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|