अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज घेऊन परतफेडीपोटी दिलेल्या धनादेशाचा अनादर केल्याबद्दल कर्जदार विठ्ठल गोरख जाधव (रा. कोल्हेवाडी, ता.नगर) यास दंडासह पाच लाख पतसंस्थेला भरपाईपोटी देण्याचा तसेच तीन महिने साधी कैदेची शिक्षा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एम. उन्हाळे यांनी ठोठावली आहे.
विठ्ठल जाधव यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी डॉन बॉस्को नागरी सहकारी पतसंस्थेतून 29 नोव्हेंबर 2012 रोजी 10 लाखांचे कर्ज आणि तीन लाखांचे कॅश क्रेडिट घेतले होते. हे कर्ज 16 टक्के व्याजदाराने दोन वर्षात भरण्याचे मान्य केले होते.
या कर्जाच्याच्या परतफेडीसाठी आयसीआयसीआय बॅंकेचा चार लाख रुपयांचा धनादेश दिला होता. पतसंस्थेने हा धनादेश बॅंकेत भरला होता.
कर्जदार जाधव यांच्या बॅंक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने धनादेशाचा अनादर झाला. जाधव यांच्याविरुद्ध निगोशिएबल इन्स्टुमेंट कायद्याखाली खटला दाखल करण्यात आला.
न्यायालयाने दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून घेतले. जाधव यांनी धनादेशाचा अनादर केल्याने पतसंस्थेला पाच लाख रुपये देण्याचा आदेश तसेच तीन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. ऍड. किशोर वैद्य यांनी पतसंस्थेच्या वतीने काम पाहिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम