Ahmednagar Breaking : धबधब्यात पडल्याने मृत्यू ! फोनवर बोलण्याच्या नादात पाय घसरला आणि

Published on -

Ahmednagar Breaking : भंडारदरा पर्यटन सफरीसाठी आलेल्या तरुणांचा रंधा धबधब्यामध्ये पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सुमित बाबासाहेब वाघमारे ( वय २१) हा तरुण आपल्या चुलतभाऊ व शिर्डीच्या अन्य मित्रांसह भंडारदरा पर्यटन स्थळावरील रंधा धबधब्याच्या परिसरात पर्यटनासाठी आला होता.

आपल्या मित्रांसमवेत रंधा धबधबा बघत असताना फोनवर बोलण्याच्या नादात त्याचा पाय घसरुन तो नदीत पडला व तसाच रंधा धबधब्यातुन वाहत गेला. यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला, राजुर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती मिळताच तात्काळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी दिलीप डगळे, अशोक काळे व प्रकाश लांडगे यांनी घटनास्थळ गाठत सुमितचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला.

त्यासाठी स्थानिकांचीही मदत घेण्यात आली. रंधा धबधब्याच्या कोसळत्या पाण्याचाही अडथळा येत होता. गळाच्या सहाय्यानेही तपासकार्य सुरू ठेवण्यात आले होते. रात्री ९ वाजता सुमितचा मृतदेह रंधा धबधब्याच्या डोहामध्ये आढळुन आला.

या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरिक्षक प्रविण दातरे यांच्या अधीपत्याखाली दिलीप डगळे व अशोक काळे पुढील तपास करत आहेत. तीन दिवसांपूर्वीच नदीत वाहून जात असलेल्या तरुणाला राजुर पोलिसांनी वाचविल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News