Income Tax Rule :- बदलत्या काळात डिजिटल व्यवहारांचा वापर वाढला असला तरी अजूनही अनेक लोक त्यांच्या घरात रोख रक्कम ठेवतात. ऑनलाइन व्यवहारांमध्ये कधी कधी तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे काही लोक सुरक्षिततेच्या कारणास्तव किंवा आवश्यकतेनुसार कॅश जवळ ठेवण्यास प्राधान्य देतात. मात्र घरी किती रोख रक्कम ठेवू शकतो? यासंबंधी अनेकांच्या मनात शंका असतात. तसेच आयकर विभागाच्या नियमांचे पालन न केल्यास दंड भरावा लागू शकतो.
महत्त्वाचा आयकर कायदा
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Marathi-News-16.jpg)
आयकर कायद्यानुसार घरी कितीही रोख रक्कम ठेवण्यास थेट कोणतेही बंधन नाही. मात्र जर आयकर विभागाने तपासणी केली आणि तुम्ही रोख रकमेचा वैध स्रोत सिद्ध करू शकला नाहीत.तर तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उत्पन्नाचा योग्य स्त्रोत नसलेल्या बेहिशेबी रोख रकमेवर आयकर विभाग कारवाई करू शकतो आणि अशा रकमेवर 137% पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवल्यास ती कायदेशीर मार्गाने मिळाल्याचे पुरावे असणे अत्यंत आवश्यक आहे.
रोख व्यवहारांबाबत नियम
रोख व्यवहारांबाबत काही विशिष्ट नियम लागू आहेत. उदाहरणार्थ कोणीही 20000 रुपयांपेक्षा जास्त रोख स्वरूपात कर्ज किंवा ठेवीच्या स्वरूपात स्वीकारू शकत नाही. तसेच, 50000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यवहारांसाठी पॅन क्रमांक देणे बंधनकारक आहे. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवत असाल किंवा व्यवहार करत असाल तर त्याचा स्पष्ट हिशोब ठेवणे आवश्यक आहे. बँकेत वार्षिक २० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करताना पॅन क्रमांक अनिवार्य केला जातो.
याशिवाय मोठ्या रोख व्यवहारांवर आयकर विभागाचे विशेष लक्ष असते. जर कोणी ३० लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेचा वापर करून मालमत्ता खरेदी किंवा विक्री केली तर संबंधित व्यक्तीची चौकशी केली जाऊ शकते. म्हणूनच कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये म्हणून रोख व्यवहार करताना सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
थोडक्यात पाहिले तर घरात रोख रक्कम ठेवण्यावर बंधन नसले तरी ती वैध उत्पन्नातून आली असल्याचे पुरावे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमांचे पालन केल्यास कोणतीही अडचण येणार नाही. मात्र नियमांकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे मोठ्या रोख व्यवहारांची नोंद ठेवणे आणि आवश्यकता असल्यास बँकिंग प्रणालीचा अधिकाधिक उपयोग करणे हा सुरक्षित मार्ग ठरतो.