महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पल्लवी जाधव यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार अनिता दळवी यांचा १ हजार ७१२ मतांनी पराभव केला. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर करण्यात आलेला महाविकास आघाडीचा प्रयोग फसला.
महापालिकेत राष्ट्रवादीने बाहेरून दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर भाजप सत्तेत आहे. असे असतानाही राज्याच्या धर्तीवर नगर शहरात महाविकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात आला.

काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने अनिता दळवी यांना रिंगणात उतरवण्यात आले. त्यांच्याविरोधात भाजपच्या पल्लवी जाधव रिंगणात होत्या. ही दुरंगी सरळ लढत असल्याने सगळ्या नगरकरांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते.
या विजयामुळे पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्याचे स्पष्ट झाले. निकाल स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही मदत केली नाही, पण शिवसेनेची काही प्रमाणात मदत झाली. शिवसेनेतील काही मित्रांनी मदत केली.माझाही जनतेशी संपर्क होताच. सर्व मतदारांच्या पाठिंब्यामुळे विजय शक्य झाला. अशी प्रतिक्रिया महापौर बाबासाहेब वाकळे यांनी विजयानंतर दिली.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला २४ जागांवर विजय मिळाला होता. परंतु पोटनिवडणुकीत प्रभाग सहाची जागा गेल्यामुळे शिवसेनेच्या संख्याबळात घट होऊन ते २३ झाले आहे. जाधव यांच्या विजयामुळे भाजपची एक जागा वाढून संख्याबळ १५ झाले आहे.