Ahmednagar Breaking : “माझ्या मृत्यूनंतर माझ्या चितेला माझी मुलगी अग्नी देईल ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा”, अशा आशयाची चिठ्ठी लिहून संजय सांभारे या ४२ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की संजय मारुती सांभारे ( राहणार डिग्रस, कोळवाची माळ, ता. राहुरी) हा तरुण काल दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी नेहमी प्रमाणे झोपेतून उठला.
त्यानंतर आवरून डिग्रस गावात चक्कर मारून आला. गेल्या काही दिवसापासून दारुची नशा व काही घरगुती कारणावरुन तो नैराश्यात जीवन जगत होता. या नैराश्यातून संजय सांभारे याने टोकाचे पाऊल उचलत काल मंगळवारी सकाळी ११.३० वाजता आपल्या राहत्या घरात कोणी नसताना छताला असलेल्या लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
काही वेळाने संजय यांची आई कमल मारुती सांभारे घरी आल्या असता त्यांना आपला मुलगा गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
आत्महत्येपूर्वी सांबारे यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली असून “माझ्या मृत्यूनंतर माझ्या चितेला माझी मुलगी अग्नी देईल. ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. मी माझ्या इच्छेने आत्महत्या करत असून यात कोणालाही जबाबदार धरु नये”, असा मजकूर त्या चिठ्ठीत लिहिलेला दिसून आला.
घटनेची माहीती मिळताच पोलिस नाईक सागर नवले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे डिग्रस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गणेश सानप हे करीत आहेत.