Mauli Gavane Murder Case : अहिल्यानगर जिल्ह्यातील दाणेवाडी येथे माऊली गव्हाणे या तरुणाचा निर्घृण खून झाल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे गावाला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. तब्बल दहा दिवसांनंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला आणि आरोपींना अटक करण्यात यश आले.
श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे बुधवारी (१३ मार्च) एका विहिरीत शीर आणि हात-पाय नसलेले धड सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. दोन दिवसांनंतर, शनिवारी (१५ मार्च) त्याच भागातील दुसऱ्या एका विहिरीत मृतदेहाचे उर्वरित अवयव – शीर, हात, आणि पाय – पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळले. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेला महाविद्यालयीन विद्यार्थी माऊली सतीश गव्हाणे (वय १९) याचाच हा मृतदेह असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिस तपासात सागर गव्हाणे आणि शुभम मांडगे या दोघांनी माऊली गव्हाणे यांचा खून केल्याचे उघड झाले. या दोघांमध्ये समलैंगिक संबंध होते आणि ही माहिती माऊलीला मिळाली होती. गावात ही बाब उघड झाली तर बदनामी होईल, या भीतीने सागर आणि शुभम यांनी कट रचून माऊलीला गोड बोलून ठार मारले.
त्यांनी माऊलीला आधी गळफास देऊन ठार केले आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह इलेक्ट्रिक कटरने तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकला. आरोपींनी गुन्हा इतक्या कुशलतेने केला होता की, पोलिसांपुढे हे प्रकरण सोडवणे एक मोठे आव्हान होते. मात्र, अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली.
माऊली गव्हाणे यांच्या हत्येचा तपास लांबत असल्याने संतप्त नातेवाईकांनी आरोपी पकडल्या जाण्यापूर्वी अंत्यसंस्कार न करण्याचा निर्धार केला होता. अखेर, रविवारी (१६ मार्च) रात्री मुख्य आरोपी सागर गव्हाणे याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सोमवारी माऊली यांच्या पार्थिवावर दाणेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरुवातीला, नातेवाईकांनी संतापाच्या भरात माऊलीचा अंत्यसंस्कार आरोपी सागर गव्हाणे यांच्या घरासमोर करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि शेवटी अंत्यसंस्कार दाणेवाडीच्या घोडनदी काठावर करण्यात आले.