Ahmednagar Breaking : अकोले तालुक्यातील माळेगाव येथील येसूबाई लालू सुकटे (वय ६०) या वृद्ध महिलेवर हल्ला करणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास राजूर वनविभागास चार तासांत यश आले.
राजूर वनपरिमंडळ क्षेत्रातील माळेगाव या खेडेगावात बुधवारी (दि. १३) दुपारी दोनच्या सुमारास अंदाजे दहा वर्षे असणाऱ्या बिबट्याने अचानक मानव वस्तीत प्रवेश केला. या गावातील कौलारू घरात घुसून त्याने वृद्ध महिला येसूबाई यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाल्या. वस्तीत आलेला बिबट्या तेथील एका पडक्या घरात आश्रयास बसला असल्याची खात्री केली. त्यानंतर सदरचे घर जाळी लावून बंदिस्त करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत साळवे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत संगमनेर येथील रॅपिड रिस्पॉन्स टीमला पाचारण करण्यात आले.
दरम्यान, जखमी येसूबाईला उपचारास राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचार करून या महिलेस नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांच्या समवेत वनपाल योगेश डोंगरे, वनरक्षक राजूर शंकर बेनके, संगमनेर रॅपिड रिसपॉन्स टीम वनरक्षक संतोष पारधी, संतोष बो-हाडे यांच्यासह राजूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा बिबट्या जेरबंद केला. यामुळे माळेगाव ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
झुंजीत जखमा झाल्याचा अंदाज वनविभागाच्या पथकाने बिबट्यास शिताफीने जेरबंद केले. त्यानंतर बिबट्यास राजूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पठाण यांचे कडून तपसानी करण्यात आली. त्याचे अंगावरील जखमांची तपासणी केली. तपासणीत त्याचे शरीरावर दोन बिबट्याच्या झुंजीमध्ये जखमा झाल्याचे प्राथमिक अंदाज असून त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याचे साळवे यांनी सांगितले.