Ahmadnagar Breaking : शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या भाविकांच्या पायी दिंडीत भरधाव वेगाने जाणारा ट्रक शिरला. यात ट्रकने चिरडल्याने ४ वारकरी जागीच ठार तर ८ जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रविवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाच वाजेच्या
सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील घारगावपासून जवळ असलेल्या नांदूर खंदरमाळजवळील सातवा मैल परिसरात घडली. मयत कोपरगाव व राहाता तालुक्यातील आहेत.
शिर्डी येथील काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी आळंदी देवाची येथे मजल दरमजल करत निघाली होती. साई नामाचा व विठ्ठल नामाचा गजर करत ही दिंडी अतिशय उत्साहाने संगमनेर तालुक्यातून जात होती. काल रविवारी सायंकाळी ही दिंडी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे पोहोचली.
दिंडीतील वारकऱ्यांनी घारगाव ओलांडून पुढचा प्रवास सुरू केला. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घारगावपासून जवळ असलेल्या सातवा मैल परिसरातून ही दिंडी जात असताना अचानक या दिंडीमध्ये भरधाव वेगाने येणारा ट्रक घुसला. हा ट्रक प्रचंड वेगाने जात असल्याने दिंडीतील अनेक वारकरी जखमी झाले.
या भीषण अपघातात गंभीर मार लागल्याने चार वारकरी जागीच ठार झाले, तर सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे दिंडीतील इतर वारकऱ्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी धावले. जखमी वारकऱ्यांना त्वरित जवळच्या आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
महामार्ग पोलिसांना अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष खेडकर हेही सहकारी पोलिसांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. या अपघातामुळे घटनास्थळावर मोठी गर्दी जमा झाली होती.
पोलिसांनी ही गदीं हटवून वाहतूक सुरळीत केली. अपघाताला कारणीभूत असणारा ट्रक (क्रमांक एमएच १२ विटी १४५५) स्थानिक ग्रामस्थांनी अडवून चालकाला ताब्यात घेतले. संतप्त नागरिकांनी या ट्रकची तोडफोड केली, या भीषण अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चालकाचे नाव छोटेलाल आर. गोपालराम पाल (वय ५०, रा. उत्तर प्रदेश) असे आहे.
या भीषण अपघातामध्ये बाळासाहेब अर्जुन गवळी (रा. मढी, ता. कोपरगाव), चोपदार बबन पाटीलबा थोरे (वय ६५, रा. द्वारकानगर, शिर्डी), भाऊसाहेब नाथा जपे (रा. कनकुरी, ता. राहाता), ताराबाई गंगाधर गमे (वय ६३, रा. कोन्हाळे, ता. राहाता) यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला,
तर बिजलाबाई शिरोळे, (रा. वाळकी, ता. राहाता), राजेंद्र कारभारी सरोदे (रा. मढी, ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड, ओंकार नवनाथ चव्हाण (रा. मढी खुर्द, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोंगरे (रा. पंचाळा, ता. सिन्नर), शरद सचिन चापके (रा. परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळ (रा. अकोला), मिराबाई मारुती ढमाले (रा. वावी, ता. सिन्नर) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मयत वारकऱ्यांचे मृतदेह शविच्छेदनासाठी संगमनेर नगरपालिकेच्या कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी नातेवाईकांना धीर दिला.
आ. थोरातांकडून मदतीच्या सूचना
या अपघातातील जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक कार्यकर्ते व प्रशासनाला केल्या. साखर कारखाना, दूध संघ यांच्यासह पठार भागातील कार्यकर्त्यांनी तातडीने जखमीना मदत पोहोचून वारकऱ्यांना दिलासा दिला. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले,
यशोधन कार्यालयातील संपर्क यंत्रणेने सर्व भाविकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून सर्वांना मदत करत मोठा दिलासा दिला. सर्व पीडित परिवारांच्या दुःखात आपण सामील असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.