Ahmednagar Breaking : अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गडावर रविवारी जालना जिल्ह्यातील सहा पर्यटक गेले असता त्यातील दोघे जण दाट धुके व मुसळधार पावसामुळे रस्ता भरकटले. त्यातील बाळु गिते या पर्यटकाचा थंडीने गारठून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेह गडावरून खाली आणण्याचे काम सुरू असून मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे अडथळा निर्माण होत आहे.
अकोले तालुक्यातील मुळा खोऱ्यातील हरिश्चंद्र गड परिसर मुसळधार पावसासाठी प्रसिद्ध आहे. हा पाऊस अनुभवण्यासाठी पर्यटक पावसाळ्यात गडावर गर्दी करतात. पुणे जिल्ह्यातील सहा जण गडावर पर्यटनासाठी आले होते.

सोसाट्याचा वारा, दाट धुके व मुसळधार पाऊस यामुळे यातील दोघेजण रस्ता भरकटले. इतरांनी दोघांचा शोध घेण्याचा अतोनात प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही. त्यांनी यावेळी वनविभागाचे अधिकारी दत्तात्रय पडवळे यांच्याशी संपर्क साधला; मात्र हरिश्चंद्र गड परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मदत कार्य राबविण्यात अडचण येत होती.
अखेर सायंकाळी पावसाचा जोर ओसरल्यानंतर बाळु गिते या इसमाचा मृतदेह गडावर आढळून आला. पाऊस व थंडीने या इसमाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राजुर पोलीस व वनविभागाचे कर्मचारी मृतदेह खाली आणण्याचे काम करत होते.