Ahmednagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील फिरंगाई मळा, या ठिकाणी चाळीसगाव, ता. गुजरदारी येथील नवविवाहित ऊसतोडणी कामगार दाम्पत्याने लग्नात झालेल्या कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली
ही हृदयद्रावक घटना रविवारी (दि.१९) रोजी रात्री उशिरा घडली. विजय राजू मेंगाळ आणि आरती विजय मेंगाळ, असे मयत पती-पत्नीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव, ता. गुजरदारी येथील विजय राजू मेंगाळ, या तरुणाचे मे महिन्यात आरती मेंगाळ हिच्याशी लग्न झाले होते. लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी मयत पती-पत्नी श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील फिरंगाई मळा परिसरात ऊसतोडणीच्या कामासाठी आले होते,
परंतु लग्नात झालेल्या कर्जाला कंटाळून या दोघांनी रविवारी रात्री उशिरा झोपडीमधील बांबूला बांधलेल्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पहाटे उघडकीस आली.
या बाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात घारगावच्या पोलिस पाटलांनी माहिती दिली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पुढील तपासाच्या सूचना दिल्या.
मयत विजय राजू मेंगाळ हा तरुण उच्च शिक्षित होता. तो पोलीस भरतीची तयारी करत असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. मे महिन्यात या तरुणाचे लग्न झाले होते.
लग्नाच्या वेळी कुटुंबावर कर्ज झाल्याने तरुण पत्नी 1 कुटुंबासह ऊसतोडणीसाठी श्रीगोंदा तालुक्यात आला होता. स्वतः उच्चशिक्षित असल्याने भविष्याचा विचार करून त्याने पत्नीसह आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.