अहमदनगर ब्रेकिंग : चौकातून युवकाचे अपहरण; कोयत्याने मारहाण

Ahmadnagar Breaking : प्रोफेसर चौकात मैत्रिणीबरोबर कॅफेतून बाहेर आल्यावर अज्ञात चौघांनी युवकाचे अपहरण करून त्याला कल्याण महामार्गावर नेऊन दांडक्याने व कोयत्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

सलमान फारुक शेख (वय २२, रा. सर्जेपुरा) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तींविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमान हा तिच्या मैत्रिणीबरोबर प्रोफेसर चौक येथे नाष्टा करण्यासाठी गेला होता. तेथील कॅफेच्या बाहेर येत असताना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून इतर लोकांना बोलवून घेतले.

चौघांनी त्याला मारहाण केली व तुला पोलिस स्टेशनला नेतो, असे म्हणून जबरदस्ती दुचाकीवर बसवून कल्याण रोडने पुलाच्या पुढे नेले. तेथे आणखी सहा ते सात अनोळखी व्यक्ती उभे होते.

या सर्वांनी त्याला लाकडी दांडक्याने व कोयत्याने मारहाण केली. तसेच मोबाईल व दोन हजार रुपये काढून घेतल्याचे, तसेच काट्यात टाकून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.