अहमदनगर ब्रेकिंग : बिबटयाचा महिलेवर हल्ला ! ओढून नेण्याचा प्रयत्न…ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : महिला झोपडीत झोपली असता, बिबट्याने तिच्यावर हल्ला करीत तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील अजनूज शिवारात शुक्रवारी रात्री घडली.

मागील आठवडयात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ही घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप पहायला मिळाला.

तालुक्यातील अजनुज येथील म्हसोबावाडी शिवारात कोळसा पाडणारी काही कुटुंबे कोप्या करून राहतात. शुक्रवारी (दि.२६) एक महिला कोपीमध्ये झोपली होती. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने त्या महिलेवर अचानक हल्ला करीत महिलेला ओढून नेण्याचा प्रयत्न केला.

महिलेने आरडाओरड केल्याने शेजारील मंडळी गोळा झाल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा चेहरा आणि हातावर जखमा झाल्या आहेत. जखमी महिलेला दौंड (जि. पुणे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात लक्ष्मी अरुण गायकवाड (मूळ रा. पाटोदा, चाळीसगाव) या तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१९) घडली आहे. ही घटना ताजी असतानाच पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe