अहमदनगर ब्रेकिंग : वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Published on -

Ahmadnagar Braking : कोल्हार- लोणी रस्त्यावरील साई सेवा सिरॅमिक दुकानालगत साडेपाच वर्षीय मादी जातीच्या बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडलेली असली, तरी ती काल सोमवारी उघडकीस आली.

याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की कोल्हार येथून लोणी रस्त्यावर अवघ्या काही अंतरावर ही घटना घडली. वनखात्याच्या माहितीनुसार मादी जातीचा हा बिबट्या रस्ता ओलांडत असताना त्यास अज्ञात वाहनाची धडक बसली.

त्यानंतर बिबट्या रस्ता ओलांडून येथील अजित मोरे यांच्या साई सेवा सिरॅमिक या दुकानालगत काटेरी झुडपात पोहोचला. मात्र रात्री-अपरात्री सुमारे दोन ते तीन दिवसांपूर्वी वाहनाच्या धडकेत मोठी दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वनक्षेत्रपाल संजय साखरे यांनी सांगितले.

ही घटना काल सोमवारी उघडकीस आली. त्यानंतर स्थानिक पत्रकारांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वनरक्षक संजय साखरे व वन रखवालदार गोरक्ष सुरासे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मयत बिबट्याचे अंत्यसंस्कार जागेवरच करणार असल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी प्रतिभा पाटील यांनी दिली. मृत बिबट्याला पहाण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती.

कोल्हार भगवतीपूर परिसरात वारंवार बिबट्याच्या तावडीत शेतकऱ्यांचे पशुधन सापडत आहे. त्यामुळे वनविभागाने शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. सोबत या घटनेवरून अद्यापही कोल्हार भगवतीपूर परिसरात बिबट्याची दहशत कायम असल्याचे अधोरेखित होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News