Ahmednagar Breaking : मंत्री विखे पाटील व माजीमंत्री आ. थोरात यांची छुपी युती असून ते मिलीभगत करुन सत्ता मिळवतात आणि इतरांवर अन्याय करतात. ज्या थोरातांनी मंत्री असतांना सन २००५ मध्ये समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याचे विधेयक विधानपरिषदेत मांडले, तेच आता दिशाभूल करीत आहेत.
त्यामुळे भंडारदऱ्याची पाणी आपल्या भागाला मिळण्यासाठी वेळप्रसंगी लढा व आंदोलने करावी लागतील, असे आवाहन अशोक कारखान्याचे माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी केले.येथील अशोक कारखान्याची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल सोमवारी पार पडली. त्यावेळी मुरकुटे बोलत होते.
मुरकुटे म्हणाले म्हणाले की, निळवंडेच्या पाण्याचा अकोले, संगमनेर, राहाता व कोपरगाव तालुक्यातील काही गावांना फायदा होईल. श्रीरामपूर व नेवासा तालुक्याला आणि उर्वरित राहुरी तालुक्याला काहीच लाभ व फायदा नाही.
पुढच्या पिढ्यांच्या हितरक्षणासाठी पाटपाण्याबाबत दक्ष राहावे लागेल. सभासदांचा आपल्यावर विश्वास असल्याने ३५ वर्षे आमच्याकडे कारखान्याची सूत्रे दिलेली आहे.
शासनाने ६२ हजार शाळांचे खाजगीकरणाचा घाट घातला आहे. त्याबाबत निषेधाचा व विरोधाचा ठराव श्रीधर आदिक यांनी मांडला.
कार्यकारी संचालक संतोष देवकर यांनी सभेच्या नोटीसचे वाचन केले. तर शिंदे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत यांनी अहवाल दुरुस्ती वाचन केले. प्रा. दिलीप खंडागळे यांनी सूत्रसंचालन केले. विरेश गलांडे यांनी आभार मानले.
संगमनेर इतका भाव का नाही
आपला कारखाना संगमनेर कारखान्या इतका भाव का देवू शकत नाही. चांगला साखर उतारा मिळाला असताना उसाला भाव मिळत नाही. मागील वर्षीच डिस्टीलरी सुरु करणार होतो, तसे झाले नाही.
कारखान्यावरचे कर्ज वाढले. इथेनॉल प्रकल्प क्षमता वाढेल पण त्यासाठी मोलॅसिस कमी पडेल. ऊस विकास वाढीस प्रोत्साहन मिळावे, अशा सूचना माजी सभापती वंदना मुरकुटे यांनी मांडल्या.