Ahmednagar Breaking : कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे पत्नी व मित्राच्या सहकार्याने प्रियकर तरुणाचा खून करून त्याच्या अल्पवयीन प्रेयसीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना गुरूवार दि. १४ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली.
नागेश ऊर्फ नाग्या शिवराम चव्हाण (वय २३, रा. जेऊरपाटोदा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन जण फरार झाले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी बाहेर गावची असल्याने तिने तब्बल दोन महिन्यांनी आरोपी अर्जुन ऊर्फ भुर्ज्या गोपाल पिंपळे (रा. कोळपेवाडी), त्याचा मित्र, भाऊ (पूर्ण नाव माहित नाही) व चांदणी पिंपळे (सर्व रा. कोळपेवाडी) यांच्या विरुद्ध फिर्याद दिली.
तीत म्हटले की, मयत नागेश चव्हाण याचे फिर्यादी तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. नागेशने मुलीस मोटारसायकलवर कोळपेवाडी येथे त्याचा मित्र अर्जुन पिंपळे व चांदणी पिंपळे यांच्या घरी नेले होते. दि. १३ जानेवारी रोजी रात्री नागेश व अर्जुन यांच्यात भांडणे झाली.
या दरम्यान चांदणीने अर्जुनचा मित्र व भावास बोलावून घेतले. त्यानंतर पहाटे ५ वाजेच्या सुमारास आरोपीच्या भावाने नागेश चव्हाणला खाली पाडून त्याचे दोन्ही हात दाबून ठेवले, नंतर अर्जुनने नागेशचा दोरीने गळा आवळून खून केला, त्यानंतर त्याने नागेशसमवेत आलेल्या अल्पवयीन मुलीस चाकुचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला.
यावेळी त्याला चांदणी पिंपळेने मदत केली व नागेशच्या प्रेतास बांधण्यासाठी साडी आणली. सर्व आरोपींनी संगनमताने प्रेत गोणीत भरुन कोठेतरी पाण्यात टाकून प्रेताची विल्हेवाट लावली.
या फिर्यादीवरून आरोपी अर्जुन पिंपळे, भाऊ (पूर्णनांव माहित नाही) व चांदणी पिंपळे यांच्या विरुद्ध खुनाचा तसेच पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिप कोळी करीत आहेत.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपी अर्जुन पिंपळे यास काल (दि. २१ मार्च) सायंकाळी कोळपेवाडी येथून अटक केली आहे. प्रभारी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासाच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.