Nashik Kumbh Mela : २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असून राज्य सरकारने नाशिक कुंभमेळा विकास योजनेत शिर्डीचा समावेश करावा आणि शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात भरीव निधी मंजूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी शहरातील ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले.

याबाबत गोंदकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी हे जागतिक किर्तीचे देवस्थान धार्मिकस्थळ असून येथे दरवर्षी कोट्यवधी भाविक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात,
तसेच विशेष सण उत्सव, गुरुपौर्णिमा, रामनवमी, विजयादशमी, विशेषता सुट्टयांच्या काळात शिर्डीत मोठ्या प्रमाणात साई भक्तांची वर्दळ असते, तसेच नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे भाविकांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
अशा परिस्थितीत, शिडीतील वाहतूक व्यवस्था, रस्त्यांचे जाळे, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक शौचालये, तसेच आरोग्य व आपत्कालीन सुविधा सुधारण्यासाठी शिर्डी नगरपरिषदेवर मोठा ताण निर्माण होणार आहे.
शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासणार आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचा कारभार तदर्थ समितीकडे असल्यामुळे साईबाबा संस्थानला सुमारे वार्षिक ४०० कोटीचे दान साई भक्तांच्या देणगीतून येते.
परंतु धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समितीला मर्यादा असल्याने शिर्डी शहराच्या सर्वांगिण विकासासाठी श्री साईबाबा संस्थान शिर्डी नगरपरिषदेसाठी निधी उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून नाशिक कुंभमेळा योजनेत शिर्डीचा समावेश करून भरीव निधी मजूर करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.