Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर जीवघेणा हल्ला झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर माघारी येत असताना
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात दहा ते बारा जणांनी हल्ला केला. यामध्ये शहराध्यक्ष सचिन चौगुले व त्यांच्याबरोबर असलेले सुरेश आरणे हे गंभीर जखमी झाले असून उपचार सुरु आहेत. हा हल्ला काल मंगळवारी रात्री झाला आहे.

चौगुले यांच्यावरील हल्ल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून काँग्रेस कार्यकर्ते व शिर्डी ग्रामस्थांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केलीये. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय.
चौगुले हे संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कार्यक्रमास गेले होते. या कार्यक्रमाहून परतत असताना सायंकाळी लोणी गावाजवळ हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून आ. बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन चौगुले यांची भेट घेत विचारपूस केली आहे.
आ. थोरातांचा आरोप
आ. बाळासाहेब थोरात यांनी घणाघात केला आहे. ते म्हणाले की, हल्ल्याची घटना ही दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई करावी जर तसे झाले नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांची दिला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी सचिन चौगुले यांनी विखेंवर निशाणा साधत टीका केली होती व आता लोणीमध्येच हा हल्ला झाला त्यामुळे अनेक चर्चांना पेव फुटले आहे.