पंचायत समिती सदस्यांच निधन ! खासदार निलेश लंके ढसाढसा रडले…पारनेर तालुक्यावर शोककळा

Updated on -

पंचायत समितीचे माजी सदस्य, पूर्वाश्रमीचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक, नीलेश लंके प्रतिष्ठानचा ढाण्या वाघ म्हणून परिचित असलेले राजेंद्र भिकाजी चौधरी वय ५३ यांनी सोमवारी सायंकाळी सात वाजता अकाली एक्झिट घेतली. पुण्याच्या खाजगी रूग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर समर्थक म्हणून सन २००७ मध्ये चौधरी हे शिवसेनेच्या तिकीटावर पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी झाले. त्यांनी आपल्या पदाच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावली. सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. अनेक शासकीय समित्यांवर त्यांनी काम केले. सध्या खंडोबा देवस्थानचे विश्वस्त म्हणून ते काम पाहत होते.

चौधरी यांच्या निधनाची बातमी सोमवारी सायंकाळी आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली. ही  बातमी ऐकूण अनेकांनी आश्रूंना मोकळी वाट करून दिली.

मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चौधरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस मोठा जनसमुदाय उपस्थित होता. खा. नीलेश लंके, आ. काशिनाथ दाते, बाळासाहेब नाहाटा, विकास रोहोकले, सुदाम पवार, सुवर्णा धाडगे, अशोक घुले, प्रकाश गाजरे, मोहन रोकडे, बापूसाहेब शिर्के, ठकाराम लंके, ॲड. राहूल झावरे, कारभारी पोटघन, बाळासाहेब दिघे, उपसभापती किसन सुपेकर, शिवाजी खिलारी, मारूती रेपाळे, डॉ. दीपक आहेर, शंकर नगरे, शिवाजी होळकर, अजय लामखडे, शिवाजी बेलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच नीलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सभासद यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

खा. लंके ढसढसा रडले 

खा. नीलेश लंके यांच्या राजकीय वाटचालीत राजेंद्र चौधरी यांचा मोलाचा वाटा होता. लंके यांच्या सुख दुःखात चौधरी हे अग्रभागी असत. अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकी राणी लंके यांच्यासमवेत ते संपूर्ण प्रचारकाळात दररोज बरोबर असत. अनेक वर्षांचा सहकारी अकाली निघून गेल्याने खा. लंके यांना अतिव दुःख झाले. अंत्यविधीप्रसंगी ढसढसा रडत त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe