Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत चाललाय का असा प्रश्न सध्या पडत आहे. कारण दररोज नवनवीन गुन्ह्याचा घटना समोर येत आहेत. नुकतेच पारनेरमधील माय लोकांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच
आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बिअर बारच्या कर्मचाऱ्याने बिल मागितले म्हणून
आम्हाला ओळखत नाहीस का?, आत्ताच जेलमधून बाहेर आलोत, आम्ही कोपरगावचे डॉन आहोत असे म्हणत त्याच्यावर चाकूने सपसप वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. २५) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कोपरगाव मध्ये घडली.
यात कामगार गंभीर जखमी झाला असून त्यांना लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ नेण्यात आले. अक्षय सुरेश शेलार (वय २९, रा. जुनी मामलेदार कचेरी, कोपरगाव) असे जखमी कामगाराचे नाव आहे.
अधिक माहिती अशी : शुभम साहेबराव आरगडे,अक्षय खंडेराव जगताप, रोहित छगन साळवे हे तिघे सदर हॉटेलमध्ये जाऊन दारू प्यायले व जेवण केले. त्यानंतर त्यांना अक्षय शेलार यांनी बिल मागितले. त्याचा राग आरोपीना आला. ‘तू आम्हाला ओळखत नाहीस का?, आम्ही आताच जेलमधून सुटून आलो आहोत,
आम्ही कोपरगावचे डॉन आहोत,’ असे म्हणून अक्षय जगताप व रोहित साळवे यांनी अक्षय शेलार यांना पकडून ठेवले. त्यानंतर शुभम आरगडे याने हॉटेलबाहेर पळत जात स्कूटीच्या डीकीमधून मोठा चाकू काढला व अक्षय शेलार यांच्या पोटावर दोन वार केले. अक्षय शेलार रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर ते तिघे फरार झाले.
घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनाम करत अधिक तपास सुरु केला आहे.