Ahmadnagar Breaking : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर- उक्कलगाव रस्त्यावरील एकलहरे शिवारात बॅटरी व्यावसायिक नईम पठाण यांच्या बंगल्यावर गुरूवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पाच दरोडोखोरांना दरोडा टाकला.
यात दरोडेखोरांचा प्रतिकार केल्याने दरोडेखोरांनी नईम यांचा गळा आवळून खून केला. तसेच त्यांची पत्नी बुशराबी यांना दरोडेखोरांनी मारहाण केली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. मारहाणीनंतर दरोडेखोर सात लाख रुपयांची रोकड व दागिने घेवून पसार झाले. दरोड्याच्या घटनेने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेले माहिती अशी की, नईम पठाण हे बॅटरी व्यावसायिक असून बेलापूर गावात त्यांचे दुकान आहे. एकलहरेशिवारातील बेलापूर- उक्कलगाव रस्त्यालगतच त्यांचा बंगला आहे. बंगल्यात नईम, पत्नी बुशराबी हे दोन मुलांसह राहतात.
गुरूवारी (दि.२१) मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान चार दरोडेखोरांनी पठाण यांच्या बंगल्यातील मागील दरवाजातून आत प्रवेश केला. त्यात एक महिलाही होती. दरोडेखोर आल्याचे लक्षात येताच पठाण यांनी प्रतिकार केला.
मात्र, दरोडेखोरांनी लहान मुलांच्या झोळीला बांधलेल्या ओढणीच्या सहाय्याने नईम ( वय ४०) यांच्या गळ्याभोवती फास आवळला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पत्नी बुशराबी (वय ३५) यांनाही दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली.
त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. पतीचा खून व पत्नीला मारहाण केल्यावर बंगल्यातील सात लाखांची रोकड व काही दागिने घेवून दरोडेखोर पसार झाले. बुशराबी शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी वडील अनवर जहागीरदार यांना फोन करुन घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती समजताच अनिस जहागीरदार व अनवर जहागीरदार है तातडीने घटनास्थळी आले. यावेळी नईम पठाण हे मयत झाले होते. बुशराबी यांना तातडीने साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अनिस जहागीरदार यांनी तातडीने ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश देवून ग्रामस्थांना जागृत केले.
घटनेची माहिती समजाताच बेलापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पीएसआय सुरेखा देवरे आदी फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाले.
अहमदनगर गुन्हा अन्वेषण शाखेची टीम देखील गावात दाखल झाली. ठसे तज्ञ तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वान पथक बंगल्याभोवतीच घुटमळले. याप्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार दरोड्याचा की घातपाताचा? या दृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहेत.