Ahmadnagar breaking : आमच्या दुकानातील येणारे गिऱ्हाईक तुझ्याकडे का वळवतो, या कारणावरून पाथर्डी शहरातील सराफ व्यावसायिक मोदक शहाणे (मानूरकर) यांना लोखंडी रॉड आणि गजाने बेदम मारहाण करण्यात आली.
गंभीर जखमी झालेले मोदक शहाणे यांना नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी पाथर्डीतील सराफ व्यावसायिक जय बाळासाहेब शहाणे, राज बाळासाहेब शहाणे, बाळासाहेब भास्कर शहाणे तसेच गोट्या उर्फ राहुल अशोक आव्हाड, विशाल उध्दव आव्हाड सर्व रा. पाथर्डी व अनोळखी एक इसम (नाव पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध मोदक शहाणे यांच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडे तक्रार दिली तर खोटा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन, अशी मारहाण करणाऱ्या आरोपींनी मोदक शहाणे यांना धमकी दिली आहे. मोदक शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
मी सोमवारी (ता. २१) रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कारने बाहेर गावावरून पाथर्डी शहरात आलो असता, बाळासाहेब भास्कर शहाणे व त्यांची दोन्ही मुले जय व राज हे यांनी माझ्या स्कार्पिओ गाडीला काळया होंडा सिटी कारची जोराची धडक मारली.
या वेळी मी व माझे सहकारी खाली उतरलो असता, माझा चुलत भाऊ बाळासाहेब शहाणे, चुलत पुतण्या जय शहाणे, राज शहाणे ( मानुरकर) गोट्या उर्फ राहुल आव्हाड, विशाल आव्हाड व एक अनोळखी इसम यांनी तुला मारून टाकतो, असे म्हणत लोखंडी गज व रॉडने मारहाण केली.
मारहाणीत मोदक शहाणे यांचा हात फॅक्चर झाला आहे. या वेळी कानिफ कराळे, गणेश चन्नेकर, आयुश मालवुनकर हे सोडविण्याकरिता आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. या वेळी आरोपींनी शहाणे यांच्या गळ्यातील चार तोळयाची चेन व वीस हजार रुपये घेऊन पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.