…अशा आहेत विविध पुराणांतील गणपतीच्या आख्यायिका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- देवीपुराण – शिवपुराणात आख्यायिकानुसार , पार्वतीने एकदिवस नंदीला द्बारपाल म्हणून नियुक्त केले आणि अंघोळ करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीला झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वतीला अपमानित वाटले.

चिखलापासून एका मूर्ती तयार केली. त्यात प्राण फुंकले. त्यानंतर एकेदिवशी या मुलाला द्वारपाल नेमून पार्वती अंघोळीस गेली. त्यानंतर शंकर तेथे आले. त्यावेळी त्या मुलाने शंकरास अडवले. त्यानंतर शंकरासोबत त्या मुलाचे युद्ध झाले. शिव व सर्व देवता या लढाईत पराभूत झाले. त्यावेळी विष्णूद्वारे मुलाला मोहित केले आणि शंकरांनी त्याचे मुंडके उडवले.

ही बातमी ऐकून पार्वती रागावली व सृष्टी नष्ट करण्यास सुरुवात केली. नारद व देवतांनी पार्वतीला शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या मुलाला जिवंत करण्याची मागणी केली.

शंकरांनी होकार दिला परंतु मुलाचे मस्तक कोठेही न मिळाले नाही. प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. तेव्हा सेवक एका हत्तीचे मस्तक घेऊन आला. त्या मुंडक्याच्या साहाय्याने मुलास जिवंत केले. शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. गणेश नावाने प्रसिद्ध झाला.

स्कंदपुराण -: स्कंदपुराणात- गणपतीच्या जन्माविषयी एक आख्यायिकेचे वर्णन केले आहे. या पुराणातील गणेश खण्डाप्रमाणे सिन्दूर नावाच्या एक दैत्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्तक छाटले. पण या अर्भकाचा मृत्यु न होता ते मुंडक नसलेले बाळ जन्माला आले.

नारदाने बालकास याचे कारण विचारले तेव्हा गजाननाने वरील घटना सांगितली. तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार गजासुराचे मस्तक छिन्न करून गणपतीने ते मस्तक स्वतःच्या शरिरावर चढवले.

स्कंदपुराणाच्या-: अर्बुद खण्डात म्हटले आहे की, पार्वतीने अंगमळापासून एक मस्तकहीन पुतळा बनवला. कार्तिकेयाने ह्या पुतळ्यास स्वतःचा भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली व त्याने एक गजमुण्ड आणले. पार्वतीचा आक्षेप असतानाही दैवयोगाने हे मस्तक धडाशी जोडले गेले. यानंतर शक्तिरूपिणी पार्वतीने पुतळ्यास जीवनदान दिले.

गजमुण्डयुक्त पुतळ्यावर नायकत्वाचा एक विशेष भाव उमटला त्यामुळे तो महाविनायक नावाने परिचित झाला. शंकरांनी या पुत्रास गणाधिपती होशील व तुझ्या पूजेविना कार्यसिद्धी होणार नाही असा आशीर्वाद दिला. कार्तिकेयाने त्यास कुर्‍हाड दिली. पार्वतीने मोदकपात्र दिले व मोदकाच्या वासाने उंदीर गणपतीचे वाहन बनला.

बृहद्धर्मपुराण –: बृहद्धर्मपुराणाप्रमाणे पार्वती पुत्रलाभाची इच्छा असताना शंकरांनी अनिच्छा प्रकट केली. यावेळी पुत्राकांक्षी पार्वतीस शंकरानी एक वस्त्र फाडून दिले व चुंबन करण्यास सांगितले. पार्वतीने त्या वस्त्राला आकार दिला व जिवंत केले. तेव्हा हा पुत्र अल्पायू आहे असे शंकर म्हणाले. मुलाचे मस्तक तत्क्षणी छिन्न झाले.

यामुळे पार्वती दुखी झाली. या वेळी उत्तरदिशेला असलेल्या कोणाचेही मस्तक जोडले तर हे बाळ वाचेल अशी एक आकाशवाणी झाली. त्यानंतर पार्वतीने नंदीस उत्तरेत पाठवले.

नंदीने देवतांचा विरोध झुगारून इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावताचे मस्तक कापून आणले. शंकरांनी हे मुंडके जोडून पुत्रास जिवंत केले. शंकरांच्या वराने इंद्राने ऐरावतास समुद्रात टाकले असता त्यासही पुनः मस्तक प्राप्त झाले.

ब्रह्मवैवर्त पुराण –: ब्रह्मवैवर्त पुराणानुसार शंख-चक्र-गदा-पद्मधारी कृष्णास पाहून पार्वतीने तशाच एका मुलाची इछा केली. कृष्णाने तसे वरदानही दिले. एकदिवस जेव्हा शिव-पार्वती क्रीडारत असताना कृष्ण वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात भिक्षा मागायला आले. त्यावेळी पार्वती भिक्षा देण्यास गेली.

आणि शंकराचे वीर्यपतन झाले व तेथे कृष्ण स्वतः शिशुरूपात अवतीर्ण झाला. वृद्ध ब्राह्मण अंतर्धान पावला. पार्वती ह्या बालकास पाहून आनंदित झाली. शनीने भीतीने केवळ डाव्या डोळ्यानेच बालकाकडे बघितले. पण तेवढ्याने बाळाचे मस्तक छिन्न होऊन कृष्णाच्या शरीरात जाऊन विलिन झाले.

पार्वती शोकाने बेशुद्ध झाली. विष्णूने पुष्पभद्रा नदीच्या तीरावर उत्तरदिशेस डोके ठेवून झोपलेल्या एका हत्तीस पाहिले. त्याचे मस्तक उडवल्याने हत्तीणी व तिचे बाळ रडू लागले. तेव्हा विष्णूने एका मुंडक्यापासून दोन मुंडकी तयार केली व एक हत्तीच्या व दुसरे गणपतीच्या धडावर स्थापिले व दोघांना जीवित केले ब्रह्मवैवर्त पुराणातील आणखी एका कथेनुसार,

माली आणि सुमाली नावाच्या दोन शिवभक्तांनी सूर्यावर त्रिशूळाने आघात केला. सूर्य निर्जीव होऊन जग अंधारात बुडाले. सूर्यपिता कश्यपाने शंकरास शाप दिला की तुझ्या मुलाचे मस्तक असेच ढासळेल. यामुळे गणपती मस्तकहीन झाला व म्हणून नंतर इंद्राने ऐरावताचे मस्तक जोडले.

वराहपुराण –: वराहपुराणानुसार , देव व ऋषिगण शंकरापाशी येऊन विघ्ननिवारणासाठी नव्या देवतेची मागणी केली असता शंकराजवळ एक बाळ प्रकट झाला. देवगण, पार्वती बालकास पाहून प्रसन्न झाली.

पण शंकर क्रोधित झाले. त्यांच्या शापाने बाळाला गजमुख, लांबडे पोट व पोटाशी नाग प्राप्त झाला. क्रोधित शंकरांच्या घामातून अनेक गणांनी जन्म घेतला. गणपती त्यांचा अधिपति झाला. या ठिकाणी गणपतीचा गणेश, विघ्नकर व गजास्य म्हणून उल्लेख आहे.

मत्स्यपुराण –: मत्स्यपुराणानुसार, पार्वती चूर्ण (भुकटी) स्वतःच्या शरीराचे मर्दन करत होती. याच भुकटीपासून तिने गणपतीची मूर्ती बनवली व गंगेत टाकली. पुतळा मोठा होत होत पृथ्वीइतका झाला. नंतर या मुलास गंगा व पार्वतीने पुत्ररूप मानले व ब्रह्माच्या आशिर्वादाने हा मुलगा गणाधिपती झाला.

वामनपुराण –: वामनपुराणानुसार, पार्वतीने स्नानाच्या वेळी अंगमळापासून चतुर्भूज गजानन मूर्ती निर्मिली व महादेव त्यास पुत्र मानून म्हणाले मला सोडूनही पुत्र जन्म झाला त्यामुळे हे बालक विनायक म्हणून प्रसिद्ध होईल व विघ्ननाशकारी होईल. ब्रह्मवैवर्त पुराण

– ब्रह्मवैवर्त पुराणानुसार , परशुराम एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून कैलासी आला, गणेशाने त्यांस अडवले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. यात परशुरामांच्या परशुमुळे गणेशाचा एक दात उपटला गेला.

शिवपुराण –: शिवपुराणानुसार, गणेश व कार्तिकेय विवाहासाठी स्पर्धा करत होते. तेव्हा दोघांमध्ये जो प्रथम पृथ्वीपरिक्रमा करेल त्याचा विवाह आधी होईल असा निर्णय झाला. कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वीपरिक्रमेस गेला. गणपतीने शंकर पार्वतीस सातवेळा प्रदक्षिणा घातली व शास्त्रमतानुसार शतवार पृथ्वीपरिक्रमा केल्याचे पुण्य मिळवल्याचा युक्तीवाद केला.

हा युक्तीवाद मान्य होऊन विश्वरूपाच्या दोन मुलींसोबत – रिद्धी (बुद्धी) व सिद्धीसोबत गणेशाचा विवाह झाला. लक्ष्य हा सिद्धीचा तर लाभ हा बुद्धीचा पुत्र होय.

विवाहाची वार्ता नारदाकडून ऐकून दु:खी कार्तिकेय क्रौञ्च पर्वतावर राहण्यास गेला. आणखी एका कथेनुसार तुलसी नामक एक नारी गणेशासोबत विवाह करू इच्छीत होती. गणपती ब्रह्मचर्यव्रती असल्याने त्याने नकार दिला व तुलसीस दानवपत्नी होशील असा शाप दिला. तुलसीनेही तुझा विवाह होईल असा शाप दिला.

महाभारत –: महाभारतामध्ये, कौरव व पाण्डव यांच्या मृत्युनंतर व्यास तपस्या करायला बसले. महाभारताच्या सर्व घटना त्यांना आठवू लागल्या. तेव्हा एका विशाल ग्रंथाच्या रचनेचा त्यांनी निश्चय केला. यासाठी त्यांना पात्र लेखनिकाची गरज होती. गणपती लेखनिक होण्यास तयार झाला. पण त्याची एक अट होती

– लिहिताना लेखणी थांबू नये. व्यासांनी उलट अट सांगितली – अर्थ न समजता गणपतीने तो श्लोक लिहू नये. यासाठी व्यासांनी महाभारतात ८८०० कूटश्लोक समाविष्ट केले. या श्लोकांचा अर्थ समजण्यास गणपतीस थोडा वेळ लागल्याने त्यांना आणखी श्लोकरचना करण्यासाठी अवसर मिळाला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment