३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : तब्बल १४४ वर्षांनंतर जुळून आलेल्या या महाकुंभातील मौनी अमावास्येच्या अमृत स्नानाला विशेष महत्त्व असल्याने कोट्यवधी लोक एक दिवस आधीच कुंभनगरीत दाखल झाले होते.ब्रह्म मुहूर्तावर अमृत स्नानाची पर्वणी साधण्याच्या आणि नागा साधूंचे दर्शन घेण्याच्या उद्देशाने लाखो भाविक संगमाच्या टोकालगत तसेच आखाडा मार्गावर बॅरिकेड्सलगतच झोपले होते.रात्री दीड वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी चेंगराचेंगरी झाली.
एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास संगमाच्या दिशेने जाणारे लोक तेथे आधीपासूनच झोपलेल्या लोकांमुळे पडले आणि एकच गोंधळ उडाला.मागून गर्दीचा रेटा असल्याने पडलेल्या लोकांना उठता आले नाही आणि भीषण चेंगराचेंगरी झाली.दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की,अनेक भाविक त्यांच्या मार्गिका सोडून आखाड्यांसाठी असलेल्या मार्गावरून संगमावर जाण्यासाठी बॅरिकेड्स ओलांडण्याचा,ते तोडण्याचा प्रयत्न करत होते.यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.

पोलीस उपमहासंचालक वैभव कृष्णा यांनी देखील आखाडा मार्गालगतचे बॅरिकेड्स तोडून संगमाच्या दिशेने धावलेल्या गर्दीने तेथे बसलेल्या-झोपलेल्या लोकांना चिरडल्याचे सांगितले.घटनास्थळाचे दृश्य मन हेलावणारे होते.घटनास्थळी मृतदेहांचा आणि भाविकांच्या सामानाचा खच पडला होता.काही लोक मृत्युमुखी पडलेल्या आपल्या आप्त स्वकियांजवळ शोकमग्न होऊन बसले होते.
गर्दीमुळे रुग्णवाहिका घटनास्थळापर्यंत नेण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.रुग्णालयांबाहेर लोकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.कुंभनगरीत उपस्थित पत्रकार किमान ४० जण मृत्युमुखी पडल्याचा दावा करत होते.परंतु प्रशासन मौन बाळगून होते.अखेरीस घटनेच्या १६ तासांनंतर पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्णा यांनी पत्रकार परिषद घेऊन चेंगराचेंगरीत ३० लोक मृत्युमुखी पडले, तर ६० जण जखमी झाल्याचे सांगितले.
मृतांपैकी २५ जणांची ओळख पटली आहे.यामध्ये कर्नाटकच्या ४, तर आसाम व गुजरातच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे.जखमींपैकी ३६ जणांवर उपचार सुरू आहेत.मौनी अमावास्येला होणारी गर्दी लक्षात घेता कुंभनगरीत कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल लागू नव्हता,असेही त्यांनी स्पष्ट केले.घटनेनंतर काही मिनिटांतच ग्रीन कॉरिडॉर तयार करून ५० रुग्णवाहिकांच्या मदतीने पीडितांना कुंभनगरीतील रुग्णालयात नेण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार वेळा फोन करून आपल्याकडून परिस्थिती जाणून घेतल्याचे योगींनी सांगितले.कुंभनगरीतील परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवा पसरवू नये,असे आवाहन योगींनी केले.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर काही तासांसाठी अमृत स्नान थांबवण्यात आले.सकाळी ते पुन्हा सुरू करण्यात आले.या दु:खद घटनेमुळे आखाड्यांचे स्नान सकाळ ऐवजी दुपारी अडीच वाजता सुरू झाले.तेरा आखाड्यांच्या साधू-संत,महंतांनी परंपरेनुसार संगमावर स्नान केले.चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे आखाड्यांनी शाही मिरवणूक काढण्याचे टाळले.