श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे आढळलेल्या मृतदेहाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली असून हा मृतदेह माऊली गव्हाणे ह्या तरुणाचाच असल्याची ओळख आईने दिलेल्या माहितीवरून झाली आहे.
माऊली सतीश गव्हाणे या तरुणाचा अत्यंत क्रूरपणे खून करून त्याचे शरीर तुकडे-तुकडे करण्यात आले असून. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही

बेपत्ता असल्याची तक्रार
ह्या बाबत सविस्तर वृत्त असे कि, माऊली गव्हाणे हा शिरूर येथील एका महाविद्यालयात बारावीमध्ये शिक्षण घेत होता. ६ मार्च रोजी रात्री १२ वाजता तो घराबाहेर पडला आणि त्यानंतर परतलाच नाही. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र कुठेही शोध लागला नाही. अखेर ९ मार्च रोजी शिरूर पोलिस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
मृतदेह माऊलीचाच
१२ मार्च रोजी गावातील एका विहिरीत एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, या मृतदेहाला डोके, हात आणि पाय नव्हते, त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले. मृतदेह सडल्याने त्याची स्थिती अधिक बिकट होती. मात्र, १५ मार्च रोजी शेजारच्या दुसऱ्या विहिरीत डोके, हात आणि पाय आढळल्यानंतर हा मृतदेह माऊलीचाच असल्याचे स्पष्ट झाले.माऊली गव्हाणे याच्या आईने त्याच्या डाव्या कानातील बाळीवरून तो मृतदेह बेपत्ता आपल्या मुलाचाच असल्याचे सांगितले आहे.
आर्थिक देवाणघेवाण
माऊलीच्या बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या बँक खात्यातून तब्बल ₹५०,००० ची आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. विशेष म्हणजे, त्याचा मोबाईल अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे हत्या आर्थिक कारणातून झाली की त्यामागे आणखी काही वेगळीच कारणे आहेत, याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे.हा खून वैयक्तिक वैमनस्यातून झाला की यामागे आर्थिक व्यवहारांचा काही संबंध आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासाचा वेग वाढवला असला तरी हत्येच्या कारणांचा ठोस शोध लागलेला नाही. मृतदेहाची जी अवस्था आढळली, ती पाहता ही हत्या पूर्वनियोजित असल्याची शक्यता अधिक आहे.
पोलिसांची तपास मोहीम
या भयंकर घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला आणि लवकरात लवकर हत्येचा उलगडा करण्याची मागणी केली. परिस्थिती लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक राकेशकुमार ओला, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत खैरे आणि बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.
संपर्कातील लोकांची चौकशी
पोलिसांकडून सिसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू असून, माऊलीच्या संपर्कात असलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे. त्याच्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती आलेला नाही.गावातील सिसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयित हालचाली शोधणे हा पोलिसांसाठी प्राथमिक मुद्दा आहे. त्याशिवाय माऊलीचा मोबाईल फोन शोधून त्याच्या अखेरच्या संवादाचा मागोवा घेणे गरजेचे आहे. पोलिसांनी त्याच्या मित्रपरिवाराकडे चौकशी सुरू केली असली तरी अद्याप कोणताही ठोस धागा हाती लागलेला नाही.
परिसरात भीती
माऊली हा वारकरी संप्रदायाशी जोडलेला युवक होता. गळ्यात तुळशीमाळ घालणारा, साध्या स्वभावाचा आणि धार्मिक वृत्तीचा असलेला तरुण अशा क्रूरपणे मारला गेला, यामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी तातडीने या हत्येचा उलगडा करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.या हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवली असून, राज्यभरात या प्रकरणाची चर्चा होत आहे. पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.