अहमदनगर ब्रेकिंग : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : राहुरी तालुक्यातील मानोरी येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात राहुरी पोलिसांना यश आले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की शनिवार दि. २१ ऑक्टोबर रोजी राहुरी तालुक्यातील मानोरी येथील लक्ष्मण रामचंद्र खामकर हे पत्नी व मुलीसमवेत पारनेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. घरी त्यांच्या वृद्ध आई सरुबई खामकर एकट्याच होत्या.

या दिवशी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी बंगल्याची बेल वाजवून सीसीटिव्ही कॅमेरा दुरूस्त करण्यास आलो आहे. असे सांगून घरात प्रवेश केला व वृद्ध सरूबाई यांच्या तोंडात बोळा कोंबत गंभीर मारहाण केली. मारहाणीत सरूबाई गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.

नंतर आरोपींनी गळ्यातील चार तोळ्याचे सोन्याचे दागिने घेऊन भामट्यांनी तेथून धूम ठोकली होती. या घटनेचा तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तात्काळ सुरु केला.

काही तांत्रिक विश्लेषणाच्या व नागरिकांनी दिलेल्या महितीवरुन कोल्हार येथील रोहित एकनाथ कानडे (वय) २४) व गणेश सुनिल लोंढे ( वय २२ वर्षे, रा. चिंचोली फाटा) या तरुणांनीच ही जबरी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर जाधव यांच्या पथकातील उपनिरीक्षक कटारे, हवालदार जायभाय, पोलीस नाईक राठोड, कॉन्स्टेबल आदिनाथ पाखरे, प्रमोद ढाकणे, महेश शेळके व सचिन ताजने यांनी आरोपीस अनुक्रमे चिचोली फाटा व श्रीरामपूर येथून शिताफिने ताब्यात घेतले.

आरोपींना राहुरी न्यायालयासमोर हजार केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कटारे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe