जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानंतर वाजणार घंटा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  राज्य सरकारने ज्या भागात करोना रुग्ण संख्या कमी आहे, तेथे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला दिले आहेत.

मात्र, नगर जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने सोमवार ऐवजी जिल्ह्यात दि.२६ तारखेनंतरच शाळा उघडणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली.

राज्यात करोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर दि.२डिसेंबर २०२१ पासून मुंबईसह राज्यभरात पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सरसकट सुरू झाल्या.

मात्र, डिसेंबरच्या अखेरीस करोना रुग्णसंख्या वाढून तिसरी लाट सुरु झाल्यानंतर पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. मात्र, गेल्या काही दिवसात करोना रुग्णसंख्या स्थिरावल्यानंतर शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक आणि पालक वर्गाकडून होत होती.

त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने २४ जानेवारीपासून शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. मात्र ज्या भागात करोनाचे रुग्ण अधिक आहेत, त्याठिकाणी स्थानिक प्राधिकरण निर्णय घेणार आहेत.

नगर जिल्ह्यातील करोना पॉझिटीव्हचा रेट हा २० टक्क्यांच्या जवळपास असल्याने जिल्ह्यात दि.२६ जानेवारीनंतर निर्णय होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe