अहमदनगर ब्रेकिंग : बाजार समितीच्या सचिवपदाचा वाद पुन्हा उफाळला ! काळे यांना पदभार देईनात, सचिवांना धक्काबुक्की करत गाडीची तोडफोड

Ahmednagar Breaking : श्रीरामपूर बाजार समितीचा वाद अद्यापही मिटेना. २०२२ पासून या वादाचे भिजत घोंगडे होते. परंतु विविध आदेशानुसार पुन्हा एकदा बाजार समितीच्या सचिव पदाचा पदभार घेण्यासाठी सचिव किशोर काळे आले असता वाद पुन्हा उफाळून आला.

यावेळी त्यांच्या वाहनाच्या काचा फोडून त्यांच्यासोबत आलेल्या कैलास भणगे या सहकाऱ्यालाही मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल (मंगळवारी) घडली.

वादाला ‘असा’ आहे इतिहास

१२ नोव्हेंबर २०२२ रोजी तत्कालीन प्रशासक दीपक नागरगोजे यांनी तत्कालीन सचिव किशोर काळे यांच्यावर ठपका ठेवत त्यांच्याकडील कार्यभार अचानक कांदा विक्री विभागाचे अधिकारी साहेबराव वाबळे यांच्याकडे दिला.

त्यानंतर काळे यांनी या निर्णयास आव्हान दिले होते. सहायक संचालकांनी सुनावणी घेत किशोर काळे यांच्या बाजूने निकाल दिला होता. याच आधारे जिल्हा सहकारी निबंधकांनी त्यांच्या नियुक्तीचा आदेश दिला.

परंतु श्रीरामपूरचे बाजार समितीने त्यांना काही हजर करून घेतले नाही. उलटपक्षी या निर्णयाविरोधात सत्ताधारी गटाने सहकार व पणन मंत्री, तसेच उच्च न्यायालयात अपील केले. पणन मंत्रालयाला १५० दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्तांनी दिलेला आदेश कायम ठेवला.

काल काय घडलं ?

पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्तांनी दिलेला आदेश कायम ठेवल्यामुळे त्यानुसार काळे यांनी अहवाल देण्यासाठी पुन्हा बाजार समिती गाठली. परंतु यावेळीही हा वाद आडवा आलाच.

प्रभारी सचिव वाबळे यांनी काही गोष्टींना यावेळी काळे यांना नकार दिला. त्यां त्यानंतर काळे बाजार समितीच्या बाहेर आले. येथे त्यांना काही अज्ञातांनी धमकावत गाडीच्या काचा फोडल्या. सहकारी कैलास भणगे यांनाही मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

सभापती नवले यांनी घेतली कारवाईची भूमिका

या घटनेबाबत बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जे कुणी चुकीचे करत असेल तर त्यांना पाठीशी घालणार नाही असे स्पष्ट केले.