Ahmadnagar Breaking : श्रीरामपूर शहरातील मध्यवस्तीतील काळाराम मंदिराशेजारी डॉ. प्रफुल्ल ब्रम्हे यांच्या घरी सोमवार दि. ३० ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता तीन चोरट्यांनी जबरी चोरी केली. डॉ. ब्रम्हे यांना खिडकीला बांधून चोरट्यांनी घराच्या कपाटातील ४० लाख रुपयांची कॅश घेऊन पोबारा केला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कॅनॉललगत काळाराम मंदिराशेजारी डॉ. ब्रम्हे यांचे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये वरच्या मजल्यावर डॉक्टर ब्रम्हेंचे घर आहे. सोमवारी पहाटे ५ वाजता डॉ. ब्रम्हे यांच्या हॉस्पिटलच्या दर्शनी भागाला शिडी लावून तीन चोरटे हॉस्पिटलच्या गच्चीवर चढले.
गच्चीवरून डक्टद्वारे दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये ते पोहोचले. हॉलमध्ये झोपलेल्या डॉ. ब्रम्हे यांना खिडकीला बांधून चोरटे लगतच्या बेडरुमध्ये गेले. डॉ. ब्रम्हे यांचा मुलगा दुसऱ्या बेडरुममध्ये झोपला होता.
त्या रुमला चोरट्यांपैकी एकाने कडी लावली. एकजण डॉ. ब्रम्हे यांच्यापाशी थांबला. दुसऱ्या दोघांनी बेडरुममधील कपाट तोडले. डॉ. ब्रम्हे यांचा मुलगा नेत्रविकार तज्ज्ञ झाला असल्याने त्याच्या हॉस्पिटलसाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी कपाटात ठेवलेली ४० लाख रुपयांची कॅश चोरट्यांच्या हाती लागली.
ती घेऊन चोरटे पळाले. चोरटे गेल्यावर डॉ. ब्रम्हेंनी कशीबशी स्वतःची सुटका केली. घडलेला प्रकार साखर कामगार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. रवींद्र जगधने यांना फोन करून सांगितला.
डॉ. जगधने यांनी घटनेची खबर पोलिसांना दिली. खबर मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उसे तज्ज्ञांच्या पथकाने कपाटावरील ठशांचे नमुने घेतले. श्वान पथकालाही पोलिसांनी पाचारण केले. श्वान पथकाने चोरट्यांनी इमारतीसमोर लावलेल्या शिडीसमोरच माग दाखवला.
हॉस्पिटलमध्ये कॅमेरे नसल्याने पोलिसांनी हॉस्पिटलसमोरील दुकानाबाहेर लावलेले कॅमेरे तपासले असता घटना घडली त्या सुमारास हॉस्पिटलसमोरून एक कार भरधाव वेगाने जाताना सीसीटीव्हीत दिसली. ही कार शहरातल्या कोणत्या रस्त्याने कोणत्या मार्गे गेली, यासाठी पोलीस शहरातील सर्व मुख्य चौकांतील सीसीटीव्ही तपासत आहेत.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी डॉ. बम्हे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळुंके हे करीत आहेत.
डॉ. ब्रम्हे यांच्या घरी ज्या पद्धतीने चोरी केली, ती पद्धत पाहाता ब्रम्हे यांच्या घरात कॅश कोठे ठेवली, याची माहिती चोरट्यांना आधीच असल्याचे जाणवते. चोरीची मोडस पाहाता सराईत गुन्हेगारांनी ही चोरी केली नसावी, असाही संशय आहे. या सर्व शक्यता गृहीत धरून श्रीरामपूर शहर पोलीस तपासाला लागले आहेत.