Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले.
या कारवाईत 50 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. आज सकाळी 10 वाजता भारतीय लष्कर पत्रकार परिषद घेऊन या ऑपरेशनची सविस्तर माहिती देणार आहे. चला, जाणून घेऊया या ऑपरेशनचे मिनिट-टू-मिनिट तपशील.

पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. धर्म विचारून निर्दोष लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या क्रूर हल्ल्याने देश हादरला. भारत या हल्ल्याला कसे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. अखेर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला कडक उत्तर दिले.
ऑपरेशन सिंदूरची थरारक कहाणी
रात्री 1:47 वाजता: पीओकेमधील मुझफ्फराबादजवळील डोंगरांमध्ये स्फोटांचा आवाज घुमला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटांनंतर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला.
1:51 वाजता: भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले सुरू केले.
2:10 वाजता: भारताने अधिकृतपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ची घोषणा केली. एकूण नऊ ठिकाणी हल्ले करण्यात आले.
2:17 वाजता: पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्यांनी कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये भारताने क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला.
4:13 वाजता: या कारवाईत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचा समन्वय होता. अचूक हल्ल्यासाठी प्रिसिजन अटॅक सिस्टीमचा वापर झाला.
4:32 वाजता: अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
4:35 वाजता: पाकिस्तानला जाणारी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली.
5:04 वाजता: हल्ल्यांपैकी चार ठिकाणे पाकिस्तानात, तर पाच पीओकेमध्ये होती. बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोटमधील तळांचा समावेश आहे.
5:27 वाजता: अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारत-पाकिस्तान तणावावर लक्ष ठेवत असल्याचे सांगितले.
5:45 वाजता: कतार एअरवेजने पाकिस्तानातील उड्डाणे रद्द केली.
6:00 वाजता: पाकिस्तानने पुन्हा युद्धबंदी करार मोडत पूंछ-राजौरी भागात गोळीबार केला.
6:08 वाजता: ऑपरेशन सिंदूरमधील सर्व भारतीय वैमानिक आणि लढाऊ विमाने सुरक्षित परतले.
6:14 वाजता: पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली.
या ऑपरेशनने भारताने दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता लष्कराच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष आहे.